Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन आज (दि. १ डिसेंबर) सुरू झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेचे नवनियुक्त सभापती सी. पी. राधाकृष्णन यांचे स्वागत केले. सी. पी. राधाकृष्णन यांनी मांसाहार का सोडला आणि त्याचा देशातील एका पवित्र शहारांशी असलेल्या नात्याचाही उलगडा केला.
सीपी राधाकृष्णन यांच्या जीवनातील एका घटनेचे स्मरण करून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "उपराष्ट्रपती झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच काशीला भेट दिली. या भेटीदरम्यान तुम्ही सांगितले की, तुम्ही पूर्वी मांसाहार केला होता; परंतु जेव्हा तुम्ही पहिल्यांदा काशीला भेट दिली आणि गंगा मातेची आरती आणि पूजा केली तेव्हा तुमच्या मनात एक संकल्प निर्माण झाला आणि त्या दिवसापासून तुम्ही मांसाहार टाळण्याचा निर्णय घेतला."
"मी असे म्हणत नाही की मांसाहारी वाईट आहेत, परंतु काशीच्या भूमीवर तुमच्या मनात हा विचार निर्माण झाला ही माझ्यासाठी संसद सदस्य म्हणून एक संस्मरणीय घटना आहे, असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले. तत्पूर्वी, सीपी राधाकृष्णन यांचे अभिनंदन करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले, "आदरणीय अध्यक्ष, आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. सभागृहात तुमचे स्वागत करणे हा अभिमानाचा क्षण आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली या सभागृहाद्वारे, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, महत्त्वाचे निर्णय घेतले जातील आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी तुमचे अमूल्य मार्गदर्शन घेतले जाईल. ही आपल्या सर्वांसाठी एक मोठी संधी आहे. सभागृहाच्या वतीने, माझ्या वतीने, मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो.
पंतप्रधानांनी यावेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "संसद देशाबद्दल काय विचार करत आहे, देशासाठी काय करू इच्छिते आणि संसद देशासाठी काय करणार आहे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विरोधकांनीही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, चर्चेत जोरदार मुद्दे उपस्थित केले पाहिजेत. पराभवाच्या निराशेवर मात केली पाहिजे. दुर्दैवाने, काही पक्ष असे आहेत जे पराभव पचवूही शकत नाहीत. मी विचार करत होतो की बिहारच्या निकालांना बराच वेळ उलटून गेल्याने ते थोडे शांत झाले असतील; पण काल मी त्यांच्याकडून जे ऐकत होतो त्यावरून असे दिसते की पराभव त्यांना सतत त्रास देत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.