

Jagdeep Dhankhar met Vice President:
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला होता. त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव हा राजीनामा दिला होता. मात्र त्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. विरोधक जगदीप धनखड गायब झाल्याचा आरोप करत होते. अनेक दिवसांपासून न दिसलेले माजी उपराष्ट्रपती धनखड अखेर अनेक महिन्यांनी नवे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना भेटले आहेत. याबाबतचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
ही त्यांची पदावरून पायउतार झाल्यानंतरचं उपराष्ट्रपतींसोबतचं पहिलीच अधिकृत भेट आहे. मात्र उपराष्ट्रपती कार्यालयाकडून या भेटीबाबतचे कोणतेही अधिकृत वक्तव्य किंवा फोटो प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही सदिच्छा भेट होती.
जगदीप धनखड हे सप्टेंबर महिन्यात राष्ट्रपती भवनात राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्याला शेवटचे दिसले होते. धनखड यांनी २१ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिला.
त्यावेळी त्यांनी आपल्या प्रकृतीचं कारण दिलं होतं. त्यांच्या या अचानक आलेल्या राजीनाम्यामुळं उपराष्ट्रपतीपदासाठी मधेच निवडणूक घ्यावी लागली. संसदेचं हिवाळी अधिवेशन हे १ डिसेंबर पासून सुरू होत आहे.
जगदीप धनखड हे नव्या आलीशान उपराष्ट्रपती भवनात राहणारे पहिले उपराष्ट्रपती होते. यापूर्वीचे उपराष्ट्रपती हे मौलाना आझाद रोडवरील राष्ट्रपती निवासात रहात होते. दोन वर्षापूर्वी उपराष्ट्रपती भवन तयार झालं. हे उपराष्ट्रपती भवन १३ एकरमध्ये पसरलं आहे.
दरम्यान, धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते छत्तरपूर येथील आपल्या खासगी निवसस्थानात वास्तव्याला आहेत. त्यांना निवृत्तीनंतर माजी उपराष्ट्रपतींना मिळणाऱ्या निवसस्थानची प्रतिक्षा करत आहेत.