राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज संसदेच्या संयुक्त अधिवेशनात संबोधित केले. Sansad TV
राष्ट्रीय

राष्ट्रपती अभिभाषण : महिला सशक्तीकरणाच्या नव्या युगाचा प्रारंभ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला विश्वास

sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला आज (दि.२७) संबोधित केले, सर्व नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन केले. 

काय म्हणाल्या राष्ट्रपती?

  • जनतेने सरकारवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे.

  • सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते.

  • मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही राष्ट्रभावनेने तुमची जबाबदारी प्रथम पार पाडाल. 

१८ व्या लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला आज (दि.२७) संबोधित केले. त्या म्हणाल्या, १८ व्या लोकसभेच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे मी मनापासून अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. देशातील मतदारांचा विश्वास जिंकून तुम्ही सर्वजण येथे आला आहात. देशसेवा आणि जनसेवेचा हा बहुमान फार कमी लोकांना मिळतो. मला पूर्ण विश्वास आहे की, तुम्ही राष्ट्रभावनेने तुमची जबाबदारी प्रथम पार पाडाल आणि १४० कोटी देशवासियांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे एक माध्यम बनाल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

जनतेने सरकारवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवला

राष्‍ट्रपती मुर्मू म्हणाल्या, "लोकसभा निवडणूक जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. अंदाजे ६४ कोटी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी महिलांचा सहभागही अधिक होता. या निवडणुकीमधील  अत्यंत सुखद चित्र जम्मू-काश्मीरमधूनही पाहायला मिळाले. काश्मीर खोऱ्यात मतदानाचे दशकांचे रेकॉर्ड मोडले गेले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची आज जगभरात चर्चा होत आहे. भारतीयांनी सलग तिसऱ्यांदा स्थिर आणि स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन केले आहे हे जग पाहत आहे. सहा दशकांनंतर हे घडत आहे. जनतेने या सरकारवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे.

 जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था 

जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यांमध्ये स्पर्धा असली पाहिजे, स्पर्धात्मक सहकारी संघराज्यवादाचा खरा आत्मा आहे. देशाचा विकास आणि राज्याचा विकास याच भावनेने पुढे जात राहू. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मच्या संकल्पामुळे आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. १० वर्षात भारत ११ व्या क्रमांकावर असलेल्या अर्थव्यवस्थेवरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. २०२१ ते २०२४ या काळात भारताचा विकास सरासरी ८ टक्के झाला आहे, असेही राष्ट्रपतींनी नमूद केले.

एमएसपीमध्ये विक्रमी वाढ

अर्थव्यवस्थेच्या उत्पादन, सेवा आणि कृषी या तीन स्तंभांना हे सरकार समान महत्त्व देत आहे. पारंपारिक क्षेत्रांबरोबरच इतर क्षेत्रांनाह प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकऱ्यांना त्यांचा अल्प खर्च भागवता यावा, यासाठी त्यांना पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत ३ लाख २० हजार कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. या सरकारच्या नवीन कार्यकाळाच्या सुरुवातीच्या दिवसांत २० हजार कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.  सरकारने खरीप पिकांसाठी एमएसपीमध्येही विक्रमी वाढ केली असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

भारताचा जागतिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार

आज जागतिक स्तरावर  सेंद्रिय उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्याची क्षमता भारतीय शेतकऱ्यांकडे आहे. त्यामुळे सरकार नैसर्गिक शेती आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांची पुरवठा साखळी मजबूत करत आहे. अशा प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचा शेतीवरील खर्चही कमी होऊन उत्पन्नही वाढेल. आजचा भारत जगाची आव्हाने वाढवण्यासाठी नाही तर जगाला उपाय देण्यासाठी ओळखला जातो. जागतिक मित्र म्हणून भारताने अनेक जागतिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. असेही राष्ट्रपतींनी आपल्‍या अभिभाषणात म्हणाल्या.

येणारा काळ हरित युगाचा

"येणारा काळ हरित युगाचा आहे. यासाठी हे सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे, हरित उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढवत आहोत, त्यामुळे हरित नोकऱ्याही वाढल्या आहेत. ग्रीन एनर्जी असो की ग्रीन मोबिलिटी, प्रत्येक आघाडीवर मोठे लक्ष्य घेऊन काम करत आहोत, असेही त्‍यांनी सांगितले.

भारतात राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांचे जाळे

भारतामध्ये आज जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ आहे. एप्रिल २०१४ मध्ये भारतात फक्त २०९ विमान मार्ग होते. एप्रिल २०२४ मध्ये त्यांची संख्या ६०५ झाली आहे. हवाई प्रवासातील या विस्ताराचा थेट फायदा टियर-2 आणि टियर-3 शहरांना होत आहे. माझ्या सरकारने १० वर्षांत पीएम ग्रामीण सडक योजनेंतर्गत गावांमध्ये 3 लाख 80 हजार किलोमीटरहून अधिक रस्ते बांधले आहेत.

आज भारतात राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांचे जाळे विणले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा वेगही दुपटीने वाढला आहे. ईशान्येकडील सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी वाढवली जात आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यटन, रोजगार अशा प्रत्येक क्षेत्रात विकासकामे पुढे नेली जात आहेत. आसाममध्ये २७ हजार कोटी रुपये खर्चून एक सेमीकंडक्टर प्लांट तयार होत आहे. म्हणजेच उत्तर पूर्व हे मेड इन इंडिया चिप्सचे केंद्रही असणार आहे. या सरकारने १० वर्षांत पीएम ग्रामीण सडक योजनेंतर्गत गावांमध्ये ३ लाख ८० हजार किलोमीटरहून अधिक रस्ते बांधले आहेत. आज भारतात राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांचे जाळे विणले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा वेगही दुपटीने वाढला आहे, असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नमूद केले.

महिला सशक्तीकरणाच्या नव्या युगाचा प्रारंभ 

सरकारने ३ कोटी महिलांना लखपती बनवण्याचे मोठे अभियान सुरू केले आहे. त्यासाठी बचतगटांच्या आर्थिक मदतीतही वाढ करण्यात येत आहे. महिलांचे कौशल्य वाढावे, त्यांच्या कमाईचे साधन वाढावे आणि त्यांचा सन्मान वाढावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नमो ड्रोन दीदी योजना हे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करत आहे. या योजनेंतर्गत बचत गटातील हजारो महिलांना ड्रोन दिले जात असून त्यांना ड्रोन पायलट बनण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचबरोबर सरकारने नुकतेच कृषी सखी कार्यक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत आतापर्यंत 30 हजार बचत गटातील महिलांना कृषी सखी म्हणून प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येत आहेत. यासाठी हे सरकार प्रति कुटुंब 78 हजार रुपयांपर्यंतची मदत देत आहे.

वंचित घटकांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध

पीएम जनमन सारख्या २४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या योजना आज अत्यंत मागासलेल्या आदिवासी गटांच्या विकासासाठी एक माध्यम बनत आहेत. वंचित घटकांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार पीएम सूरज पोर्टलच्या माध्यमातून कर्जही उपलब्ध करून देत आहे.

डिजिटल इंडिया आणि पोस्ट ऑफिसच्या नेटवर्कचा वापर करून अपघात आणि जीवन विम्याचे कव्हरेज वाढवण्याचे काम केले जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आज मजबूत आणि फायदेशीर आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा २०२३-२४ मध्ये १.४ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाईल, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी जास्त आहे.

तरुणांचा सहभाग आणखी वाढवण्यासाठी प्रयत्नशील

डिजिटल विद्यापीठ तयार करण्याच्या दिशेनेही सरकार प्रयत्नशील आहे. अटल टिंकरिंग लॅब्स, स्टार्ट-अप इंडिया आणि स्टँड-अप इंडिया यांसारख्या मोहिमा आपल्या तरुणांची क्षमता वाढवत आहेत. या प्रयत्नांमुळे आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप इकोसिस्टम बनला आहे. या सरकारने  राष्ट्र उभारणीत तरुणांचा सहभाग आणखी वाढवण्यासाठी 'मेरा युवा भारत माय भारत' मोहीम सुरू केली आहे. त्यात आतापर्यंत दीड कोटींहून अधिक तरुणांची नोंदणी झाली आहे. या उपक्रमामुळे तरुणांमध्ये नेतृत्व कौशल्य आणि सेवाभावाची बीजे पेरली जातील, असा विश्‍वासही

राष्ट्रपती मुर्मू आपल्या अभिभाषणात म्हणाल्या, सरकारने  CAA कायद्यांतर्गत निर्वासितांना नागरिकत्व देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे फाळणीमुळे पिडित असलेल्या अनेक कुटुंबांना सन्मानाचे जीवन जगणे शक्य झाले आहे. ज्या कुटुंबांना CAA अंतर्गत नागरिकत्व मिळाले आहे त्यांच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचे वैभव आणि वारसा पुन्हा प्रस्थापित करत आहे. अलीकडेच नालंदा विद्यापीठाच्या भव्य कॅम्पसच्या उद्घाटन केले. 

भारतातील जनतेने नेहमीच लोकशाहीवर पूर्ण विश्वास

आज संपूर्ण जग लोकशाहीची माता म्हणून आपला आदर करते. भारतातील जनतेने नेहमीच लोकशाहीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे आणि निवडणुकांशी संबंधित संस्थांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. सुदृढ लोकशाही टिकवायची असेल तर हा विश्वास जपला पाहिजे आणि त्याचे रक्षण केले पाहिजे.

आजच्या काळात तंत्रज्ञान दिवसेंदिवस अधिक प्रगत होत आहे. अशा परिस्थितीत त्यांचा मानवतेविरुद्ध होणारा गैरवापर अत्यंत घातक आहे. भारतानेही जागतिक स्तरावर या चिंता व्यक्त केल्या आहेत आणि जागतिक चौकटीचा पुरस्कार केला आहे. गैरवापर थांबवणे आणि या आव्हानाला तोंड देण्यासाठी नवीन मार्ग शोधणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असेही त्या म्हणाल्या. 

 राज्यघटना सार्वजनिक जाणीवेचा भाग बनली पाहिजे

राष्ट्रपती म्हणाल्या, भारत कोरोनाचे संकट असो, भूकंप किंवा युद्धजन्य परिस्थिती असो, मानवतेला वाचवण्यात भारत आघाडीवर आहे. हे सरकार  भारतीय राज्यघटनेला केवळ शासनाचे माध्यम मानत नाही, तर राज्यघटना सार्वजनिक जाणीवेचा भाग बनली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून  सरकारने २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. आता  जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यघटना पूर्णपणे लागू झाली आहे, जिथे कलम ३७० मुळे परिस्थिती वेगळी होती.

विकसित भारत घडवू या

गेल्या १० वर्षांत झालेल्या सुधारणांमुळे देशात जो नवा आत्मविश्वास आला आहे, त्यामुळे आपण विकसित भारत बनवण्यासाठी नवी गती प्राप्त केली आहे. विकसित भारताची निर्मिती ही देशातील प्रत्येक नागरिकाची आकांक्षा आणि संकल्प आहे हे आपण सर्वांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. हा संकल्प पूर्ण होण्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे शतक भारताचे शतक आहे आणि त्याचा प्रभाव पुढील हजार वर्षांपर्यंत राहील. आपण सर्वांनी मिळून पूर्ण निष्ठेने राष्ट्रीय संकल्पांच्या पूर्ततेत सहभागी होऊन विकसित भारत घडवू या. असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT