Jammu Kashmir Operation Ashdar Pudhari
राष्ट्रीय

Jammu Kashmir Operation Ashdar: जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षादलांना मोठे यश; लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी यासिर ठार

Jammu Kashmir Operation Ashdar: जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षादलांनी ‘ऑपरेशन अशदार’दरम्यान लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी यासिर याचा खात्मा केला.

Rahul Shelke

Jammu Kashmir Operation Ashdar: जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षादलांची कारवाई सुरू असून, ‘ऑपरेशन अशदार’दरम्यान लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी यासिर ठार झाला आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत यासंदर्भातील माहिती दिली. यासिर हा पाकिस्तानी नागरिक असून, तो लष्कर-ए-तैयबाच्या सुलेमान मूसा गटाशी संबंधित होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘ऑपरेशन अशदार’मध्ये यासिरचा खात्मा

जम्मू-कश्मीर पोलिसांनी ‘ऑपरेशन अशदार’अंतर्गत केलेल्या कारवाईत यासिरचा खात्मा केला. पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये, “तुम्ही पळून जाऊ शकता, पण लपून राहू शकत नाही,” असा संदेश देत यासिरची ओळख लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी म्हणून केली.

यासिर यूसमर्ग परिसरात लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर म्हणून सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणा त्याच्या हालचालींवर गेल्या काही काळापासून लक्ष ठेवून होत्या.

चिनार कोर, पोलिस आणि CRPFची संयुक्त कारवाई

‘ऑपरेशन अशदार’ची सुरुवात गुरुवारी, 3 सप्टेंबर रोजी, बडगाम जिल्ह्यातील अशदार गली परिसरातील दुर्गम डोंगराळ आणि घनदाट जंगलात करण्यात आली. भारतीय लष्कराच्या चिनार कोर, जम्मू-कश्मीर पोलिसांच्या SOG आणि CRPFच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई सुरू केली.

सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचा एक संशयित गट पीर पंजाल पर्वतरांगांमधील उंच डोंगरवाटांमधून पखेरपोरा (पुलवामा) येथून यूसमर्ग (बडगाम)च्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली.

गोळीबारानंतर चकमक; यासिर ठार

सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना आव्हान दिल्यानंतर त्यांच्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा पाकिस्तानी दहशतवादी यासिर ठार झाला.

चकमकीनंतर घटनास्थळावरून AK-सीरीजची असॉल्ट रायफल, मॅगझिन, मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि इतर संशयित युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे.

जंगल परिसरात शोधमोहीम सुरू

यासिर ठार झाल्यानंतरही सुरक्षा दलांनी परिसरातील शोधमोहीम थांबवलेली नाही. घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात आणखी दहशतवादी किंवा संशयित लपून बसले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव यूसमर्ग आणि दूधपथरी या परिसरातील पर्यटकांच्या हालचालींवरही काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

यासिरच्या साथीदारांचाही शोध

यासिर हा लष्कर-ए-तैयबाच्या सुलेमान मूसा गटाचा सदस्य होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून तो या गटापासून वेगळा होऊन स्वतंत्रपणे कारवाया करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

यासिरच्या एन्काउंटरनंतर सुरक्षा यंत्रणा आता त्याच्या संपर्कातील व्यक्ती आणि साथीदारांचा शोध घेत आहे. तसेच तो जम्मू-कश्मीरमध्ये कोणत्या मोठ्या दहशतवादी कटात किंवा कारवाईत सहभागी होता का, याचाही तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT