Multiple drones sighted in J&K's Rajouri
श्रीनगर : पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास आणि चिथावणीखोर कारवाया केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC) दोन पाकिस्तानी ड्रोन घिरट्या घालताना आढळले.
'इंडिया टूडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, राजौरी सेक्टरमधील डुंगला-नाबला परिसरात अनेक पाकिस्तानी ड्रोन दिसून आले. नियंत्रण रेषेचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच भारतीय जवानांनी मानक कार्यप्रणालीनुसार (SOP) या ड्रोनवर गोळीबार केला. या हवाई घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठी लष्कराने प्रभावी पावले उचलली असून सध्या संपूर्ण परिसरावर कडक देखरेख ठेवली जात आहे.
राजौरीच्याच 'थंडी कस्सी' भागातही आणखी एक संशयास्पद ड्रोन दिसल्याने सुरक्षा दलांना 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. राजौरी आणि शेजारील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील भागात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे.
कथुआ जिल्ह्यातील बिलवार येथील वनक्षेत्रात दहशतवादविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये सुमारे १५ मिनिटे चकमक झाली. त्यानंतर गोळीबार थांबला असला तरी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून बुधवारी सकाळी पुन्हा नव्याने शोधमोहीम सुरू केली जाणार आहे.
गेल्या रविवारी रात्रीही सांबा, राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ पाच संशयास्पद ड्रोन हालचाली दिसून आल्या होत्या. हे ड्रोन भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करून संवेदनशील ठिकाणांवर घिरट्या घालून पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने निघून गेले होते. सीमेपलीकडून शस्त्रे किंवा अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी या ड्रोनचा वापर होत असल्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.
मंगळवारीच आपल्या वार्षिक पत्रकार परिषदेत बोलताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत सुनावले होते. ते म्हणाले की, "नियंत्रण रेषेवरील ड्रोनच्या हालचाली स्वीकारार्ह नाहीत. आम्ही पाकिस्तानला त्यांचे ड्रोन आवरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत." मंगळवारी भारत आणि पाकिस्तानच्या 'डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स' (DGMO) स्तरावर चर्चा झाली, ज्यात भारताने ड्रोन घुसखोरीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आपली रणनीती बदलली असून 'ऑपरेशन सिंदूर' अत्यंत अचूकतेने राबवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "दहशतवादी कारवायांमध्ये घट झाली असली तरी पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणारे समर्थन अद्याप सुरूच आहे. कोणत्याही दुःसाहसाला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देईल," असा इशाराही जनरल द्विवेदी यांनी दिला होता.