

Jagdeep Dhankhar admitted hospital
नवी दिल्ली: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना आज (दि.१२) दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (१० जानेवारी) त्यांना दोनवेळा भोवळ आली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जानेवारी रोजी धनखड हे स्वच्छतागृहात गेले असता त्यांना दोनदा भोवळ आली होती. आज ते नियमित तपासणीसाठी एम्समध्ये गेले असता, डॉक्टरांनी त्यांना अधिक चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. आज त्यांची 'एमआरआय' (MRI) चाचणी केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
जगदीप धनखड यांना यापूर्वीही सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान असा त्रास जाणवला आहे. उपराष्ट्रपती पदावर असताना कच्छचे रण, उत्तराखंड, केरळ आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची शुद्ध हरपल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.