नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील लोक भारतीय कुटुंबाचा भाग आहेत. तो दिवस दूर नाही जेव्हा ते स्वतः भारताच्या मुख्य प्रवाहात परततील, असे मोठे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. मला विश्वास आहे की पाकव्याप्त काश्मीरमधील लोक आपले आहेत, आपल्या कुटुंबाचा भाग आहेत.
आज भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या आपल्यापासून वेगळे झालेले आपले बांधव देखील त्यांच्या आत्म्याचा आवाज ऐकून एक दिवस भारताच्या मुख्य प्रवाहात परततील यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असेही ते म्हणाले. तसेच पाकिस्तानशी चर्चा फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्लीतील भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) 'बिझनेस समिट'मध्ये बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमधील बहुतेक लोकांना भारतासोबत खोलवरचे नाते वाटते. फक्त काही जणांची दिशाभूल झाली आहे. भारत नेहमीच हृदये जोडण्याबद्दल बोलतो आणि आम्हाला विश्वास आहे की प्रेम, एकता आणि सत्याच्या मार्गावर चालून तो दिवस दूर नाही जेव्हा पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग होईल, असेही ते म्हणाले. तसेच पाकिस्तानला जाणीव झाली आहे की दहशतवादाला पोसण्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल, अशीही टीका संरक्षणमंत्र्यांनी केली.
संरक्षणमंत्री म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान संपूर्ण देशातील लोकांनी मेक-इन-इंडिया मोहिमेचे यश पाहिले आहे. आज हे सिद्ध झाले की, मेक-इन-इंडिया केवळ देशाच्या सुरक्षेसाठीच नाही तर देशाच्या समृद्धीसाठी देखील आवश्यक आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताच्या स्वदेशी संरक्षण प्रणालीची क्षमता आणि ताकदीने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले. तसेच आम्ही केवळ लढाऊ विमाने किंवा क्षेपणास्त्र प्रणाली तयार करत नाही तर पुढील पिढीच्या युद्ध तंत्रज्ञानाची तयारी देखील करत आहोत.
देशाच्या भविष्यासाठी तयार असणारी संरक्षण व्यवस्था तयार करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. भारताची संरक्षण निर्यात १० वर्षांपूर्वी १००० कोटी रुपयांपेक्षा कमी होती, आता ती २३ हजार ५०० कोटी रुपयांच्या विक्रमी आकड्यावर पोहोचली आहे, असेही ते म्हणाले.