Pakistan has nuclear bombs, will attack if necessary Maryam Nawaz
पुढारी ऑनलाईन :
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कडक कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. एकीकडे पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवरील चौक्यांवरून रात्रीचा अंदाधुंद गोळीबार सुरूच आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानातील नेत्यांकडून भारताविरूद्ध चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत. त्यातच पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाजने भारताविरूद्ध गरळ ओकली आहे. मरियम नवाजने भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे.
पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी भारताविरूद्ध गरळ ओकली आहे. भारताच्या कारवाईच्या भीतीने त्यांनी गरज पडल्यास भारतावर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. मरियम नवाज या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी आहे. त्यांच्या या विधानाने पाकिस्तान भारताच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने घाबरलेला असल्याचे दिसून येत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची सर्व स्तरावर कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. भारताने सिंधु करार स्थगित करून पाकच्या तोंडचे पाणी पळवले. दुसरीकडे पाकिस्तानी दुतावासातील अधिकाऱ्यांची संख्या कमी केली. तसेच भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनाही तात्काळ देश सोडून देण्याचे आदेश काढण्यात आले. पाकिस्तानशी होणारा व्यापारही आता थांबवण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला याचा मोठा फटका बसला आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी सैन्याला या आधीच दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची सूट देउन टाकली आहे. त्यातच आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली CCS, CCPA बैठकीत पाकिस्तानवरील कारवाईवर शिक्कामोर्तब होणार आहे. पंतप्रधान मोदी आज चार बैठका घेणार असून, यानंतर कॅबीनेटचीही महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. त्या आधीही पंतप्रधान मोदी यांच्याकडून अशाच स्वरूपाच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. यानंतर पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्यांवर भारतीय सैन्याने मोठी कारवाई फत्ते केली होती. सध्या मोदींकडून कारवाईसाठी सैन्याला देण्यात आलेली सूट आणि बैठकांचा धडाका पाहता पाकिस्ताननचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे पाकिस्तानने सीमेवर रात्री गोळीबार करण्यास सुरूवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतानेही सीमेवरील तैनाती वाढवली असून, शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.