Love story
नवी दिल्ली : राजस्थानमधील भारत-पाक सीमेजवळ पाकिस्तानमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना आंध्र प्रदेशातील एका तरुणाला लष्कराने पकडले. प्रशांत वेदम असे त्याचे नाव असून तो विशाखापट्टणमचा रहिवासी आहे. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी जात असल्याचे त्याने सांगितले. यापूर्वीही एकदा सीमा ओलांडून तो पाकिस्तानमध्ये गेला होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत वेदम शुक्रवारी दुपारी खाजूवाला येथे बसमधून उतरला आणि आंतरराष्ट्रीय सीमेकडे चालत निघाला. त्याचवेळी लष्करी तळाजवळ असलेल्या जवानांना त्याचे वर्तन संशयास्पद वाटले. त्यांनी त्याला थांबवले आणि चौकशी करून खाजूवाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
तपासात आढळले की, प्रशांतचा सीमा ओलांडण्याचा हा पहिला प्रयत्न नव्हता. यापूर्वी, 2017 मध्ये, तो बीकानेरमधील करणी पोस्ट मार्गे पाकिस्तानमध्ये घुसला होता. त्यावेळी त्याला पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. 2021 पर्यंत तो त्यांच्या ताब्यात होता, त्यानंतर त्याला अटारी सीमेमार्गे भारतात पाठवण्यात आले. पुन्हा पाकिस्तानमध्ये जाण्याच्या प्रयत्नामुळे लष्कराला त्याच्यावर संशय आहे.
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, तो सांगत आहे की, पाकिस्तानमध्ये तुरूंगात असताना एका महिलेवर प्रेम झाले होते. ती दुसऱ्या कोठडीत तुरुंगात होती. तिला भेटण्यासाठी तो पाकिस्तानात परत जात होता. तो अजूनही त्या मुलीच्या संपर्कात आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, आंध्र प्रदेशात प्रशांतच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. त्याच्या भावाने त्याला मानसिक आरोग्याची समस्या असल्याचे सांगितले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशांत हा बीटेक पदवीधर आहे. त्याने चीन आणि आफ्रिकेतही काम केले आहे. गुप्तचर यंत्रणा एकत्रितपणे त्याची चौकशी करत आहेत.