पुढारी ऑनलाईन डेस्क : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी आणि अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी श्री माता वैष्णोदेवी कटरा ते नवी दिल्ली अशी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. उत्तर रेल्वेने ही सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवाशांना कटरा, उधमपूर आणि जम्मू स्थानकांवरील काउंटरवर तिकिटे उपलब्ध असतील, अशी माहिती जम्मू- काश्मीर सरकारच्या प्रशासनाने दिली आहे.
ट्रेन क्रमांक : 04612, प्रस्थान : श्री माता वैष्णो देवी (SMVD) कटरा, सुटण्याची वेळ : रात्री ९ वाजून २० मिनिटांनी (2120 Hours), ही ट्रेन शहीद कॅप्टन तुषार महाजन स्टेशन उधमपूर येथे थांबा घेईल.
ही विशेष रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी करण्यास आणि नवी दिल्लीकडे येण्यासाठी, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. ही रेल्वे सकाळी ०९.३० वाजता नवी दिल्लीला पोहोचेल. तसेच, रामबन येथील राष्ट्रीय महामार्ग एकेरी मार्ग म्हणून कार्यान्वित करण्यात आला आहे. काश्मीर आणि जम्मू येथे अडकलेले प्रवासी या विशेष रेल्वेने प्रवास करू शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काही विमान कंपन्यांनी जम्मू काश्मीरमधून बाहेर जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरात वाढ केली होती. यावर नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी भाडेवाढ टाळण्यासाठी विमान कंपन्यांना कडक सूचना दिल्या आहेत.