

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी सांगितले की, श्रीनगरहून पर्यटकांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, विमान कंपन्यांना भाडेवाढ रोखण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
(Srinagar Travel Update)
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही विमान कंपन्यांनी भाड्यात वाढ केल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तातडीने हस्तक्षेप केला. भाडेवाढ टाळण्यासाठी विमान कंपन्यांना कडक सूचना दिल्या असून दर वाजवी मर्यादेत ठेवले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याआधी घोषित केलेल्या ४ अतिरिक्त उड्डाणांव्यतिरिक्त, बुधवारी दिल्लीकडे जाणारी आणखी ३ उड्डाणे जोडण्यात आली आहेत. यात इंडिगोची दोन उड्डाणे आणि स्पाइसजेटचे एक उड्डाण आहे. तसेच, तिकीट रद्द व वेळा बदल शुल्क माफ करण्यात आले आहे.
श्रीनगर विमानतळावर अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी बाहेर अतिरिक्त मंडप उभारण्यात आला आहे. आज सकाळी ६ ते दुपारी १२ दरम्यान विमानतळावरून ३३३७ प्रवाशांचे २० उड्डाणे सुरळीत पार पडली आहेत.
राममोहन नायडू म्हणाले, “ही एकतेची वेळ आहे. आम्ही प्रत्येक नागरिकासोबत आहोत. आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत पोहोचवली जाईल.”