Pahalgam Terror Attack
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला गेले तर राहुल गांधी जखमींना भेटायला काश्मीरला गेले, असे म्हणत काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केली.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेडा सोशल मीडियावर म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ला होऊन ४ दिवस झाले. यामध्ये कोणत्या पक्षाच्या नेत्याने काय केले, नेते कुठे गेले, काय सांगितले, कोणत्या पक्षाने काय भूमिका घेतली, याची तुलना आवश्यक असल्याचे म्हणत त्यांना गेल्या ४ दिवसात घडलेल्या घडामोडींचे उदाहरण दिले.
पवन खेडा म्हणाले की, हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला गेले. नितीश कुमारांसोबत ते हसत होते. भाजपने एका मृत व्यक्तीच्या आणि त्याच्या विधवा पत्नीचे कार्टून बनवले. भाजपने सर्वपक्षीय बैठकीत खोटी माहिती दिली. भाजपने या हल्ल्यासाठी देशवासीयांमध्ये देशभक्तीचा अभाव असल्याचे म्हटले. तर राहुल गांधी काश्मीरमध्ये जखमींना भेटायला गेले. काँग्रेसने संकट काळात आम्ही सरकारसोबत उभे असल्याचे म्हटले. काँग्रेसने सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली. काँग्रेसने सरकारला पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे सांगितले, अशी थेट तुलना पवन खेडा म्हणाले.
खेडा म्हणाले की, या हल्ल्याद्वारे पाकिस्तानला काश्मिरींच्या रोजीरोटीवर हल्ला करणे आणि भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमधील संघर्ष वाढवणे हे साध्य करायचे होते ते त्यांनी मिळवले. तर हल्ल्यानंतर लगेचच रा. स्व. संघ समर्थित संघटनांनी देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांना धमक्या दिल्या आणि भारतीय मुस्लिमांविरुद्ध विष ओकत पाकिस्तानला जे हवे होते तेच केले, अशीही टीका त्यांनी केली.