नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चिनाब नदीवरील बगलिहार धरणातील पाण्याचा प्रवाह कमी केला आहे. तसेच झेलम नदीवरील किशनगंगा धरणासाठीही अशाच प्रकारची रणनिती आखत असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारत आता आणखी काही ठोस पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सर्वतोपरी पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय भारताने घेतले आहेत. शनिवारी पाकिस्तान मधील मालाची भारतातील आयात बंद करण्यात आली. त्यानंतर आता चिनाब नदीतून होणारा पाणीपुरवठा रोखण्याच्या तयारीत भारत आहे.
या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, जम्मूमधील रामबनमधील बागलिहार आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा ही जलविद्युत धरणे भारताला पाणी सोडण्याच्या वेळेचे नियमन करण्याची क्षमता देतात. भारतातून पाकिस्तानात वाहणाऱ्या चिनाब आणि झेलम या नद्या पाकिस्तानच्या जीवनरेखा मानल्या जातात. पाकिस्तान सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी त्यांच्यावर अवलंबून आहे.
बागलिहार धरण बऱ्याच काळापासून भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांतील वादाचा विषय आहे. या प्रकरणात पाकिस्तानने जागतिक बँकेची मध्यस्थी मागितली आहे. किशनगंगा धरणावरही पाकिस्तानचा आक्षेप आहे. दरम्यान भारताने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानचा आणखी तिळपापड होण्याची शक्यता आहे.