

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने दिल्लीत जंतर मंतर येथे शांततापूर्ण मोर्चा आणि शोकसभा आयोजित करण्यात आली. यावेळी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच पिडीतांना न्याय देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावले जावे, अशीही मागणी शरद पवार गटाने केली.
पक्षाचे दिल्लीतील नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर दुःख व्यक्त करण्यात आले. या वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर करण्यात आले. याद्वारे पक्षाने मागणी केली की, पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावले जावे, हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी आणि जखमी झालेल्या नागरिकांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी. तसेच संपूर्ण देशभरात हिंदू-मुस्लिम ऐक्य जपण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असेही निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी बोलताना पक्षाचे दिल्ली अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अमनदीप सिंग सहनी म्हणाले की, आम्ही शांततेचा संदेश घेऊन आलो आहोत. आम्ही जबाबदारी निश्चित व्हावी आणि दहशतीने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना न्याय मिळावा, यासाठी इथे आहोत. पीडितांना न्याय आणि द्वेषाविरोधात ठाम भूमिका हिच आमची मागणी आहे. तर पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनीश गवांदे म्हणाले की, दहशतवाद हा आपल्याला फोडण्याचा प्रयत्न करतो. मात्र आमचा संदेश स्पष्ट आहे, आम्ही तुटणार नाही आणि आम्हाला गप्पही करता येणार नाही. भारताची खरी ताकद आपल्या एकतेत आहे आणि ती आपल्याला टिकवावी लागेल, असेही ते म्हणाले.