बैसरण या पर्यटनस्थळावर सध्या शुकशुकाट जाणवत आहे. (Pudhari Photo)
राष्ट्रीय

Pahalgam Terror Attack | हल्ल्यानंतर बाजार, पर्यटनस्थळे ओस पडली

Pahalgam Terror Attack Market Tourism News Update | आता आम्ही पोट कसे भरायचे? व्यापारी, व्यावसायिक धास्तावले

पुढारी वृत्तसेवा
शिवाजी काळे (पहलगाम)

Pahalgam Attack Market Tourism News Update

श्रीनगर : पहलगाम हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली. हल्ल्यानंतर सर्व पर्यटकांनी हॉटेल्स सोडली आहेत. त्यामुळे हॉटेल्स ओस पडली आहेत. परिणामी, कोरोनानंतर हॉटेल क्षेत्रात मोठी बेरोजगारी निर्माण होण्याची शक्यता हॉटेलमालक व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. आमचे हातावरचे पोट आता कसे भरणार, या विवंचनेत हॉटेल कर्मचारी आहेत.

'शत्रूने चुकीचे केले... आमच्या लोकांना मारले असते तरी चालले असते. पर्यटकांना मारायला नको होते. पर्यटक आमच्यासाठी देव आहेत. पर्यटकांना मारल्याने लोक इकडे यायला घाबरत आहेत. तरीही पहिली गोळी आमच्या छातीवर घेऊ,' असे पर्यटन क्षेत्रात काम करणारे ४१ वर्षीय अदिल खान सांगतात. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी हॉटेल बूक केली आहेत. या हल्ल्यानंतर पर्यटक येणार का? अशी भीती हॉटेलव्यावसायिक व्यक्त करत आहेत.

बाजारपेठांत कमालीची शांतता

काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रूट, केशरचा व्यवसाय चालतो.पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटकांनी पाठ फिरवल्याने बाजारपेठा अक्षरशः ओस पडल्या आहेत. मालाला ग्राहक नसल्याने व्यापारी चिंतेत आहेत. याचा फटका व्यापाऱ्यांसह उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे.

ड्रायव्हर, घोडेस्वारांवर बेरोजगारीचे संकट

पर्यटकांना विविध ठिकाणी नेण्याचे काम कारचालक आणि घोडेस्वार करतात. पर्यटक आले नाहीत तर घोड्यांचे चारा-पाणी कसे करायचे, असा प्रश्न या लोकांना सतावत आहे. पर्यटनामुळे युवकांना मोठ्या प्रमाणात हॉटेलात आणि ड्रायव्हर म्हणून काम मिळते. अनेकांनी बँकांचे कर्ज घेऊन स्वतःच्या गाड्या घेतल्या आहेत. आता पर्यटक फिरकले नाहीत तर बँकेचे कर्ज कसे भरायचे,असा यक्षप्रश्न युवकांपुढे उभा ठाकला आहे. कोरोना काळात आम्हाला कर्जफेडीसाठी मुदतवाढ दिली गेली. आता मुदतवाढ कोण देणार? असा सवाल ड्रायव्हर सुहैल यांनी केला. दहशतवादी हल्ला झाल्यापासून घरात सगळीकडे उदासी दाटून आल्याचे त्यांनी खिन्न चेहऱ्याने सांगितले.

सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था

पहलगाम मुख्यालयाच्या ठिकाणापासून ७ किलोमीटर आत जंगलात असलेल्या बैसरण या पर्यटनस्थळाला 'पुढारी टीम'ने भेट दिली. हल्ला झालेले ठिकाण मुख्य रस्त्यापासून ७ किलोमीटर आत आहे. त्या ठिकाणी कोणतीही वाहने जात नसल्याने घोड्याचा वापर करूनच तेथे पोहोचता येते. सध्याच्या स्थितीत घोडेस्वार उपलब्ध नसल्याने पायी चालत चिखलातून मार्ग काढत 'पुढारी पुढारी टीम' तेथे पोहोचली. ज्या ठिकाणी पर्यटकांवर हल्ला झाला तेथे गुरुवारी लष्करी अधिकाऱ्यांनी भेट देऊन विविध सूचना सुरक्षा रक्षकांना दिल्या. दिवसभर वैसरण परिसराला सुरक्षा रक्षकांचा वेढा पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले. तेथे काही ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेले सामान पाहायला मिळाले.

हल्ल्याच्या ठिकाणी अनेक सिलिंडर

हल्ला झालेल्या ठिकाणी असलेल्या दुकानांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात सिलिंडर फेकून देण्यात आल्याचे दिसून आले. जर एखाद्या सिलिंडरवर गोळी मारली गेली तर त्यातून अनर्थ ओढवू शकतो. त्यामुळे हे सिलिंडर दुकानदारांनी जंगलाच्या बाजूला फेकल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. सिलिंडर तेथून हटवले नसते तर मोठा स्फोट झाला असता, असे स्थानिकांनी सांगितले.

चिखलात चपलांचा ढीग

हल्ला झाला त्या बैसरण परिसरात मोठ्या प्रमाणात चपला, बूट, मोजे यासह लहान मुलांच्या टोप्या चिखलात पडलेल्या पाहायला मिळाल्या. हल्ला झाल्यानंतर पर्यटक आपले सामान तिथेच सोडत जीव मुठीत घेऊन तेथून बाहेर पडले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराचे जवान बैसरण भागात शोध मोहीम राबवत आहेत. प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा रक्षकांकडून कसून चौकशी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT