सांगली : दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आम्ही घटनास्थळपासून केवळ अर्धा ते एक कि. मी. अंतरावर होतो. आदल्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी त्याचवेळेला पहलगामला भेट दिल्याने वाचलो. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आम्हला जे सहकार्य, मदत केली ते जन्मभर विसरण्यासारखे नाही, असे भावोद्गार प्रमोद दत्तात्रय जगताप यांनी व्यक्त केले.
प्रमोद जगताप हे कुपवाड रोड मिरज येथे रहातात. त्यांना पर्यटनाची आवड आहे. ते आपल्या पत्नी-मुलासह आणि मित्र आणि त्यांची पत्नी, असे सात जण काश्मीरच्या पर्यटनासाठी 14 ते 24 एप्रिल असे दहा दिवस गेले होते. यापूर्वीही त्यांनी अनेकदा काश्मीरला भेट दिली आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा ते टेकडीखाली सुमारे अर्धा कि.मी. अंतरावर कुटुंबीयांसमवेत होते. गोळीबारचा आवाज त्यांना आला नाही, मात्र थोड्याच वेळात चार ते पाच लष्करी हेलीकॉफ्टर भिरभिरू लागली. लष्कराने परिसराचा ताबा घेतला. त्यानंतर एकच धावपळ उडाली. सर्व हॉटेल, दुकाने पटापट बंद झाली. तेव्हा या हल्ल्याची माहिती मिळाली. शंभरभर पर्यटकाना मारल्याची अफवा पसरली. आमची घाबरगुंडी उडाली. टॅक्सीही बंद झाल्या, मात्र स्थानिक नागरिकांनी आम्हाला धीर दिला. जेवण, खाणे मोफत देण्यात आले. इतकेच काय बूट, इतर साहित्यही भेट दिले. टॅक्सी चालकांनी जीव धोक्यात घालून आम्हाला सुरक्षितपणे इच्छित स्थळी पोहोचविलेे.
त्यानंतर आम्ही श्रीनगरला पोहोचलो. विमानाचे 24 रोजी बुकिंग होते. त्यानुसार आम्ही हैदराबादमार्गे सांगलीला पोहोचत आहोत. दहशतवाद्यांच्या क्रूर हल्ल्याबरोबर स्थानिकांनी दिलेला धीर, मदत आम्ही जन्मभर विसणार नाही.