नवी दिल्ली : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी भारतातील पाकिस्तानी मुलींबाबत सोमवारी खळबळजनक दावा केला. भारतात ५ लाखांहून अधिक पाकिस्तानी मुली लग्न करुन राहत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. या सर्व पाकिस्तानी मुलींनी भारतीयांशी लग्न केले आहे. मात्र, त्यांना आजपर्यंत भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही, असे खासदार दुबे म्हणाले. याला त्यांनी दहशतवादाचा नवा चेहरा म्हटले आहे.
निशीकांत दुबे यांनी या संदर्भात ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, हा दहशतवादाचा नवा चेहरा आहे. या अंतर्गत शत्रूंशी कसे लढायचे? असा सवाल त्यांनी केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला असताना हे विधान आले आहे. दुबे यांचा हा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनला आहे. मात्र, त्यांच्या दाव्याची पुष्टी करणारा कोणतीही अधिकृत माहिती किंवा विश्वसनीय स्रोत अद्याप समोर आलेला नाही.
‘एक्स’वरील पोस्ट संदर्भात माध्यमांशी बोलताना खासदार दुबे म्हणाले की, या प्रकरणी सखोल चौकशीची आवश्यकता आहे. पाकिस्तानी मुलींचे भारतीयांसोबत लग्न झाले आहे. मात्र, त्या भारताच्या नागरिक होऊ शकत नाहीत आणि वर्षानुवर्षे येथे राहत आहेत. पाकिस्तानी पुरुषांनीही भारतात लग्न केले आहे. या लग्नांमागील हेतू काय आहे याची चौकशी करण्याची गरज आहे.