Punjab Police arrest two spy in Amritsar
दिल्ली: पंजाब पोलिसांनी अमृतसरमध्ये दोन गुप्तहेरांना अटक केली आहे. हे गुप्तहेर भारतीय सैन्याची माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या दोघांचेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी (ISI) संबंध असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर गुप्त हेरगिरी करणाऱ्या आरोपींची ओळख पटली असून, त्यांची नावे पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तहेर भारतीय लष्करी छावण्या आणि हवाई तळांचे फोटो शत्रू राष्ट्र पाकिस्तानला पाठवत होते. तुरुंगात असलेल्या हरप्रीत सिंग उर्फ पिट्टू उर्फ हॅपी याच्याशीही त्यांचे संबंध असल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात माहिती देताना पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी ट्विट केले की, "शनिवारी अमृतसर ग्रामीण पोलिसांनी अमृतसरमधील लष्करी छावणी क्षेत्रे आणि हवाई दलाच्या तळांची संवेदनशील माहिती आणि छायाचित्रे लीक करण्याच्या आरोपाखाली पलक शेर मसीह आणि सूरज मसीह या दोघांना अटक केली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, त्यांचे पाकिस्तानी गुप्तचर एजंटांशी संबंध आहेत. ज्यांचे संबंध सध्या अमृतसर मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या हरप्रीत सिंग द्वारे स्थापित केले गेले आहेत. अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. तपास जसजसा तीव्र होत जाईल तसतसे आणखी महत्त्वाचे खुलासे अपेक्षित आहेत."