इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसारन व्हॅलीमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला असून या हल्ल्याला कुख्यात लष्कर-ए- तोयबा दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे. भारत सरकारने या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात तीव्र पातळीवर राजनैतिक व सुरक्षा पावले उचलली आहेत.
या हल्ल्यामध्ये प्रामुख्याने विदेशी दहशतवाद्यांचा समावेश असून, त्यांना काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी व ओव्हरग्राऊंड वर्कर्सकडून मदत मिळाल्याचे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि लष्कर प्रमुख हाफिज सईद हाच या दहशतवाद्यांचा प्रमुख 'हँडलर' असल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानमधून थेट नियंत्रण भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, या गटावर थेट हाफिज सईद आणि त्याचा डिप्टी सैफुल्ला यांचे नियंत्रण आहे. हे दोघे सध्या पाकिस्तानमधून कार्यरत आहेत. याशिवाय पाकिस्तानची गुप्तचर संस्था खडख यांच्याकडून या गटाला धोरणात्मक, तांत्रिक व आर्थिक मदत मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
या दहशतवादी गटाने यापूर्वीही काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मोठे हल्ले घडवले आहेत. २०२४च्या ऑक्टोबरमध्ये बुटा पात्री येथे एका हल्ल्यात दोन भारतीय लष्कराचे जवान आणि अन्य दोन जण ठार झाले होते. त्या महिन्यातच सोनमर्गमध्ये बोगदा बांधणीच्या कामगारांवर झालेल्या हल्ल्यात सहा मजूर आणि एक डॉक्टर मारले गेले. पहलगाम हल्ल्याचा मुख्य संशयित हाशिम मुसा या हल्ल्यातही सहभागी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.