इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तान सरकारला मला अटक करायची असेल, तर त्यांनी यावे आणि मला अटक करून दाखवावे. पण, आम्ही काश्मीरसाठी सुरू केलेला लढा थांबविणार नाही, असा इशारा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि 'जमात-उल-दावा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याने पाक सरकारला दिला आहे.
हाफिज म्हणाला, ''आमच्यावर तुम्ही कितीही दबाव टाकला तर अधिक जोराने आम्ही पुढे येऊ. काश्मीरबाबत योग्य न्याय झाला नसल्याने आम्ही लढाई सुरू ठेवणार आहे. तसेच काश्मीरप्रश्न योग्य प्रकारे सोडविण्यासाठी भूमिका घेतली, तर नवाज शरीफ यांना आम्ही पुन्हा पंतप्रधान करू.'' अशी ऑफरही त्याने शरीफ यांना दिली आहे.
हाफिज सईदला जागतिक स्तरावरील दहशतवादी म्हणून अमेरिकेने घोषित केले आहे. तरीही सईद रोजसपणे पाकिस्तानमध्ये फिरत आहे. अमेरिका आणि भारताच्या दबावामुळे आम्हाला प्रसिद्धी देण्यास प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आल्याचा आरोपही सईदने केला आहे.
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात सईदची नजर कैदेतून मुक्तता करण्यात आली होती. त्याच्यावर एक कोटी डॉलचा ईनाम आहे.