Parliament Monsoon Session 2025
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा मोठ्या गोंधळात गेला. त्यानंतर आज सोमवारपासून पहलगाम दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'वर लोकसभेत तर मंगळवारपासून राज्यसभेत चर्चा होत आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा सुरू होण्यापूर्वीच लोकसभेत विरोधी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. “तुम्हाला ॲापरेशन सिंदूरवर चर्चा करायची आहे की नाही?,” असा सवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना केला.
ओम बिर्ला म्हणाले, "आधी, तुम्ही ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी करता, नंतर सभागृहात, तुम्ही वेलमध्ये येता. जर तुम्हाला चर्चेत सहभागी व्हायचे नसेल, तर कृपया तुमच्या जागी बसा. तुम्हाला ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झालेली हवी आहे की नाही?... मी सभागृह तहकूब करु का?".
यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, ''विरोधकांनी यू-टर्न घेतला आहे. हे चालणार नाही. काही वेळाने संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होईल. संरक्षण मंत्री ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला सुरुवात करतील. मी सर्वांना त्यांचे ऐकून घेण्यासाठी आवाहन करतो. कोणत्याही विरोधी पक्षाने पाकिस्तानची भाषा बोलू नये."
दरम्यान, लोकसभेचे कामकाज आज सकाळपासून तीनवेळा तहकूब झाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले. दरम्यान, विरोधक सभागृहात त्यांच्या मागण्या मांडत राहिल्याने, अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. ते म्हणाले, "मी तुम्हाला (विरोधी पक्षाचे खासदार) विनंती करतो की ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सभागृहात होऊ द्या."