Operation Sindoor
दोन महिन्यांपूर्वी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात उद्ध्वस्त केलेला पाकिस्तानचा रहीम यार खान हवाई तळ अजूनही बंदच आहे. यावरुन पाकिस्तानच्या या लष्करी तळाचे किती मोठे नुकसान झाले आहे? हे स्पष्ट होते. पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने याबाबत आणखी एक नोटीस जारी करत हा हवाई तळ ५ ऑगस्टपर्यंत वापरण्यायोग्य नसल्याचे जाहीर केले आहे. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हा हवाई तळ बहावलपूरपासून सुमारे २३० किमी दक्षिणेला तर भारताच्या राजस्थानला लागून असलेल्या सीमेजवळ आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला भारताने केलेल्या अचूक क्षेपणास्त्रांचा हल्ल्यांत या हवाई तळाचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, मे महिन्याच्या अखेरीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बिकानेर येथे संबोधित करताना सांगितले होते की, हा हवाई तळ 'आयसीयू'मध्येच आहे.
रहीम यार खान हवाई तळ हा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात आहे. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर हा हवाई तळ विमान उड्डाणांसाठी मे महिन्यात एक आठवड्यासाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर जूनच्या सुरुवातीला पुन्हा नोटीस करत या हवाई तळ बंदची मुदत ४ जुलैपर्यंत वाढवण्यात आली. अद्याप या हवाई तळ दुरुस्तीचे काम सुरू असून धावपट्टी उड्डाणांसाठी उपलब्ध नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावरुन पाकिस्तानच्या या हवाई तळाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
रहीम यार खान हवाई तळावर क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. यामुळे धावपट्टीवर मोठा खड्डा पडला होता, असे पाकिस्तानच्या जिल्हा आयुक्तांनी मे महिन्यात स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले होते. दरम्यान, दोन महिन्यांहून अधिक काळ हा हवाई तळ बंद असल्याने त्याचे मोठे नुकसान झाले असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
या हवाई तळाव्यतिरिक्त, रावळपिंडीतील चकलाला येथील नूर खान हवाई तळ, पंजाबमधील शोरकोट येथील रफीकी हवाई तळ, मुरीद आणि चुनियान हवाई तळावर एकाच वेळी हल्ले करण्यात आले होते. नूर खान येथील विमानांचे आणि चुनियान येथील तांत्रिक सुविधांचे मोठे नुकसान झाल्याची स्पष्ट कबुली पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीही दिली होती.