भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये ९ दहशतवादी तळांवर केलेल्या अचूक हल्ल्यांनंतर गुरुवारी सॅटॅलाइट फोटो समोर आले आहेत, दरम्यान, त्या ठिकाणांवरील विध्वंस झालेली दृष्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
Maxar Technologies या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या तुलनात्मक उपग्रह फोटोमधून बहावलपूरमधील जामिया मशिद तसेच पाकिस्तानमधील मुरीदके शहरातील लेट (LeT) च्या प्रशिक्षण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
मुरीदके, शेखूपुरा (पंजाब, पाकिस्तान) येथील नंगल सहदान परिसरात ८२ एकरांवर पसरलेले हे केंद्र लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचे मुख्य प्रशिक्षण केंद्र होते. बहावलपूरमधील जामिया मशिदीचेही मोठे नुकसान झाले असून, हल्ल्याआधी आणि नंतरच्या फोटोमधील फरकातून हे स्पष्ट होते.
मार्कज सुब्हान अल्लाह, जे की कराची मोर, बहावलपूर जिल्ह्यातील NH-5 (कराची-तोरखम महामार्ग) येथे वसलेले आहे, हे जैश-ए-मोहम्मद (JeM) चे मुख्य केंद्र होते. १५ एकरांवर पसरलेल्या या ठिकाणी युवकांना दहशतवादी बनवण्यासाठी प्रशिक्षण दिले जात होते.
भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांच्या नऊ दहशतवादी तळांवर लक्ष्य करून त्यांचा खात्मा केला.
या मोहिमेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये ४ ठिकाणी, तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये ५ ठिकाणी अचूक हल्ले केले. संपूर्ण कारवाई भारताच्या सीमांमध्येच केली गेली.
संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की ही कारवाई "लक्ष केंद्रीत, मोजकी आणि संघर्ष टाळणारी" होती, तसेच कोणत्याही पाकिस्तानी लष्करी केंद्रावर हल्ला करण्यात आलेला नाही. ही कारवाई जम्मू-काश्मीरच्या पाहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आली, यामध्ये २६ नागरिकांचा बळी गेला होता.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी झालेल्या पाहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाशी संबंधित पाकिस्तानप्रशिक्षित दहशतवाद्यांचा सहभाग होता. या भ्याड हल्ल्यात २५ भारतीय आणि १ नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतरचा हा सर्वात गंभीर नागरी हल्ला असल्याचे त्यांनी नमूद केले.