Sachin Pilot statement on Operation Sindoor  file photo
राष्ट्रीय

Operation Sindoor | संसदेत १९९४ चा ठराव पुन्हा मंजूर करण्याची काँग्रेसची मागणी; काय आहे 'तो' ऐतिहासिक ठराव

Sachin Pilot statement on Operation Sindoor | काँग्रेसने संसदेत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत १९९४ मधील ऐतिहासिक ठराव पुन्हा एकदा मंजूर करण्याची मागणी केली आहे.

मोहन कारंडे

Sachin Pilot statement on Operation Sindoor

दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये अचानक झालेल्या युद्धबंदी आणि त्यानंतर काही तासांतच झालेल्या उल्लंघनावर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मोठे विधान केले आहे. भारतीय सैन्याचे कौतुक करतानाच त्यांनी अमेरिकेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. १९९४ चा ठराव संसदेत पुन्हा मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे.

१९९४ च्या ठरावाची पुनरावृत्ती करावी

काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, "भारतीय सशस्त्र दलांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की ते कोणापेक्षाही मागे नाहीत. गेल्या २४ तासांतील घटनांची साखळी वेगाने बदलली आहे. पाकिस्तानला त्याच्या कृत्यांसाठी शिक्षा देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोधी पक्ष आणि संपूर्ण देशाने पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानने ज्या पद्धतीने युद्धबंदीचे उल्लंघन केले तो चिंतेचा विषय आहे. अमेरिकेने युद्धबंदीची घोषणा केली आणि अमेरिकन बाजूने तटस्थ ठिकाणी चर्चा व्हावी अशा गोष्टीही सांगितल्या. हा चिंताजनक विषय आहे. काश्मीरचे आंतरराष्ट्रीयीकरण आम्हाला मान्य नाही, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून पंतप्रधानांनी विरोधी पक्षांना विश्वासात घेतले पाहिजे. तसेच विशेष अधिवेशनात १९९४ चा ठराव पुन्हा एकदा सर्वपक्षीय एकमताने मंजूर करावा, अशी मागणी पायलट यांनी केली आहे.

१९९४ चा ऐतिहासिक ठराव नेमका काय होता?

२२ फेब्रुवारी १९९४ रोजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात संसदेत एकमताने ठराव केला होता. या ठरावात स्पष्ट म्हटले होते की, पाकव्याप्त काश्मीर (PojK) हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो भारतात पुन्हा आणला जाईल. अटलबिहारी वाजपेयी त्यावेळी विरोधी पक्षनेते होते.

अमेरिकेकडून काश्मीर मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न 

सचिन पायलट म्हणाले, "१९७१ च्या युद्धात अमेरिकेने म्हटले होते की आम्ही बंगालच्या उपसागरात ७ वा नौदल तैनात करत आहोत, परंतु असे असूनही, इंदिरा गांधी यांनी सर्वोच्च राष्ट्रीय हितासाठी सर्व केले. आज आम्ही त्यांना अशा नेत्या म्हणून आठवतो ज्यांच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोच्च होते. संसदेवरील हल्ल्याच्या वेळीही, जेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि सोनिया गांधी विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या, तेव्हा त्यांनी म्हटले होते की विरोधी पक्ष सरकारसोबत आहे. यावेळीही विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला, परंतु अमेरिकेने ज्या पद्धतीने युद्धबंदीची घोषणा केली तो द्विपक्षीय मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न होता," असे पायलट यांनी म्हटले आहे.

खर्गेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धबंदीच्या घोषणांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधी पक्षांची केली आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पुन्हा एकदा ही मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT