श्रीनगर : पाकिस्तानने शनिवारी केलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलात (Border Security Force – BSF) उपनिरीक्षकपदावर कार्यरत असलेले मोहम्मद इम्तियाज शहीद झाले. आर एस पुरा सेक्टर येथील सीमारेषेवर ते तैनात होते. बीएसएफ जम्मू विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
बीएसएफ जम्मूने X (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर शनिवारी रात्री आठ वाजता पोस्ट टाकली आहे. यात असे म्हटले आहे की, 10 मे रोजी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात BSF मधील उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज यांचा मृत्यू झाला. बीएसएफचे महासंचालक आणि अधिकाऱ्यांनी इम्तियाज कुटुंबीयांचे सांत्वन केले. रविवारी सकाळी जम्मूतील बीएसएफच्या मुख्यालयात इम्तियाज यांच्या पार्थिवावर शासकीय इतिमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शनिवारी सकाळी अधिकाऱ्याचा मृत्यू
पाकिस्तानने शनिवारी सकाळी केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात जम्मू- काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यासह पाच नागरिकांचा मृत्यू झाला होता. राजौरी येथे ही घटना घडली. राजकुमार थापा (वय ५५) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राजकुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता.
युद्धविराम अन् चार तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य तणावादरम्यान शुक्रवार रात्रीपासून सुरू असलेल्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी पूर्ण आणि तात्काळ युद्धविरामासाठी सहमती दर्शवल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही पत्रकार परिषदेत या वृत्ताला दुजोरा दिला. शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून भारत- पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, या घोषणेला चार उलटत नाही तोवर पाकिस्तानने पुन्हा कुरापती सुरू केल्या. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे घोर उल्लंघन सुरू आहे. ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. भारत जशास तसे उत्तर देईल, असा इशाराच परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानला दिला आहे.