Parliament Monsoon Session 2025
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकण्यात देशभक्तीचे वाटते. मात्र, प्रत्यक्षात हा माध्यमांमध्ये सरकारचा तमाशा आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी लोकसभेत केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये काय साध्य झाले ? हे कोणीही सांगत नाही. किती दहशतवादी पकडले गेले? भारताने किती लढाऊ विमाने गमावली? ही जबाबदारी कोणाची आहे, चूक कोणाची आहे. यावर सरकारने उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली. विरोधकांच्या प्रश्नांची भिती वाटत असेल तर सरकारने खुर्ची सोडावी, असा घणाघात त्यांनी केला.
ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान सभागृहात बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात प्रश्न विचारण्यावर बंदी आहे. सरकार प्रश्न ऐकू इच्छित नाही. जबाबदारीपासून सरकार पळ काढत आहे, असा हल्लाबोल खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. क्रोध, वेदना आणि अपमानाची भावना घेऊन सभागृहात उभी आहे, असे त्या म्हणाल्या.
मुख्य मुद्द्यांपासून नागरिकांचे लक्ष हटवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी खेळ आणि मनोरंजनात जनतेला व्यस्त ठेवले जाते. यामध्ये आता महत्वपूर्ण निवडणूकीपूर्वी दहशतवादी हल्ला असा भर पडला आहे, असा आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी केला. दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरात कारवाई केली जाते. दहशतवादी कुठून आले, कुठे गेले ? हे सरकारला काहीच माहिती नाही. मात्र, सरकारला शेजारी देशावर हल्ला करायचा आहे आणि त्याच्या आधारावर मते मिळवायची आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला. पहलगाम हल्ल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी गेले होते. पंतप्रधान २४/७ निवडणूक मोडमध्ये असतात, असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.
मला आपल्या सैनिकांच्या शौर्याबद्दल अजिबात शंका नाही. हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देणे आणि अमेरिकेच्या दबावाखाली शस्त्रसंधी करणे, हे चूकीचे होते, असे शिंदे म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा यापूर्वी कधीच इतकी कमकुवत नव्हती, असे त्या म्हणाल्या. एकेकाळी भारताच्या सर्वात जवळ असलेले नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका आज चीनशी हातमिळवणी करत आहेत. या अपयशाचे उत्तर कोण देणार? शेजारच्या देशांच्या उदासीनतेचे उत्तर कोण देणार असे सवाल त्यांनी केले.