

सोलापूर : विधानसभा निवडणुका भाजपने षड्यंत्र करून जिंकल्या आहेत. राहुल गांधी यांनी लेख लिहून भाजपला उघडे पाडले आहे. निवडणूक आयोगाला जाब विचारला असता निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर न देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उत्तर देत आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये, अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी (दि. 10) पत्रकार परिषदेद्वारे केली.
विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळा आणि विविध विषयांसंदर्भात काँग्रेस भवन येथे मंगळवारी खा. शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते. खा. शिंदे म्हणाल्या, मुख्यमंत्री फडणवीस हे फसवे आकडेवारी देतात. मतदानाच्या वेळेनंतर मतदानाची आकडेवारी अचानक कशी वाढली. याचे उत्तर देत नाहीत, सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज विचारले असता फुटेज देता येत नाही, असे सांगत आहेत.
महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे जनतेचे हाल होत आहेत. त्याकडे लक्ष द्यावे. सरकारी अधिकार्यांवर प्रचंड दबाव आहे. कार्यकर्त्यांना काम करायला अडचण येत आहे. भाजप अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. ते त्यांनी बंद करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संजय हेमगड्डी, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, परवीन इनामदार, अनुराधा काटकर, मनोज यलगुलवार, शकील मौलवी, प्रमिला तुपलवंडे, गणेश डोंगरे, नागनाथ कदम उपस्थित होते.
ऑपरेशन सिंदूरबाबत प्रचारसभेत मोठमाठे फिल्मी डायलॉग मारणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी जगभरात शिष्टमंडळे पाठवीत आहेत. व्यापाराची धमकी देऊन सीजफायर मी करायला लावले म्हणून अमेरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत बारावेळा जाहीरपणे सांगितले. त्यावर मोदी शांत का आहेत. त्यामुळे सैन्यदलाचे मनोबल कमकुवत होत असल्याचेही खा. शिंदे यांनी सांगितले.
शहरात गेल्या 12 वर्षांपूर्वी विमानसेवा सुरू होती. भाजपच्या काळात ती बंद पडली. मागील 11 वर्षे देशात, राज्यात भाजपची सत्ता होती, तरीही विमानसेवा सुरू होण्यास इतका वेळ लागला. सर्वांच्या प्रयत्नाने विमानसेवा सुरू झाली. त्याचे स्वागत आहे; परंतु गोव्याला विमानसेवा सुरू करून कोणते उद्योग येणार आहेत. विमानसेवाच सुरू करायची असेल, तर सोलापूर ते मुंबई, तिरुपती, बंगलुरू, हैदराबाद, पुणे या ठिकाणी सुरू करा, असे आवाहनही त्यांनी केले.