Operation Sindoor file photo
राष्ट्रीय

Operation Sindoor: पाकचे मिराज विमान पाडले; भारतीय हवाईदलाने 150 किलोमीटर आत घुसून हल्ला केल्याचे स्पष्ट

Operation Sindoor: पत्रकार परिषदेत दिली माहिती; मिलिर कँट येथील तळ केला उद्धवस्त

पुढारी वृत्तसेवा

Operation Sindoor armed forces press conference

नवी दिल्ली: भारतीय वायुसेनेने पाकिस्तानात तब्बल 150 किमी आत घुसून कराचीतल्या मिलिर कँट (Malir Cantt) येथील हवाई संरक्षण तळावर अचूक हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे.

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तानचे एक मिराज फायटर जेट पाडल्याची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात आली. या हल्ल्याचे थरारक दृश्य भारतीय लष्कराने X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे.

दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संरक्षण दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ही पत्रकार परिषद लेफ्टनंट जनरल राजीव घई (सैन्य), एअर व्हाइस मार्शल ए.के. भारती (हवाई दल) आणि वाइस ॲडमिरल ए.एन. प्रमोद (नौदल) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

मिराज फायटर जेटला भारतीय उत्तर

या वेळी त्यांनी स्पष्ट केले की, मे ९ आणि १० च्या रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या सर्व हवाई हल्ल्यांना भारताच्या बहुस्तरीय एअर डिफेन्स आणि अँटी-ड्रोन प्रणालीने यशस्वीरित्या प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानच्या मिराज जेटव्यतिरिक्त चीन आणि तुर्कस्तानमध्ये बनवलेले ड्रोन तसेच PL-15 क्षेपणास्त्रेही भारताच्या संरक्षण यंत्रणांनी नष्ट केली आहेत.

लष्कराकडून व्हिडिओ जारी

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या मिराज फायटर जेटच्या अवशेषांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केला आहे. यामध्ये विमानाच्या भागांचे जळालेले अवशेष, ढासळलेले उपकरणे आणि घटनास्थळी सैन्याचे हालचाली स्पष्टपणे दिसून येतात.

पाकिस्तानच्या सैन्याने रविवारी सांगितले होते की, त्यांच्या एका लढाऊ विमानाला "किरकोळ नुकसान" झाले आहे. मात्र, कोणते विमान होते किंवा कसे नुकसान झाले याबाबत त्यांनी कोणतीही ठोस माहिती दिली नव्हती.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताने मिराज जेटला पाडल्याची कबुली देत पुरावे सादर केले.

उपग्रह चित्रांमधून उघड झाले थरारक दृश्य

भारतीय वायुसेनेने (IAF) प्रसारित केलेल्या उपग्रह चित्रांमध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर आणि हवाई तळांवर झालेल्या हल्ल्याचे स्पष्ट पुरावे दिसून आले आहेत.

विशेषतः बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुरिदके येथील लश्कर-ए-तैयबाच्या अड्ड्यावर झालेल्या अचूक कारवाईची दृश्यमाध्यमातून पुष्टी झाली आहे.

चकलाला, रफिक, रहीम यार खान, सरगोधा, भुलारी आणि जेकबाबाद येथेही हल्ले

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानविरुद्ध निर्णायक प्रतिहल्ला सुरू केला.

रविवारी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने कराचीतील मिलिर कँटव्यतिरिक्त चकलाला, रफिक, रहीम यार खान, सरगोधा, भुलारी आणि जेकबाबाद येथील लष्करी हवाई तळांवरही हल्ले केले.

IAF च्या निवेदनात म्हटले आहे, “ऑपरेशन सिंदूर हे अत्यंत अचूक, व्यावसायिक आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन राबवण्यात आले.

या कारवाईमुळे दहशतवादी धोके कमी झाले, पाकिस्तानची आक्रमकता रोखली गेली आणि भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या शून्य सहनशीलतेच्या भूमिकेचा पुनरुच्चार झाला.”

सीजफायरनंतरही ऑपरेशन सुरू

भारत आणि पाकिस्तानने शनिवारी शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली असली, तरी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत काही लष्करी कारवाया अद्याप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर IAF ने नागरिकांना अफवा आणि अप्रमाणित माहिती टाळण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT