

नवी दिल्ली : सोमवारी दहाच्या सुमारास एकदाच ड्रोन दिसल्यानंतर रात्री कोणतेही ड्रोन सिमेजवळ दिसले नसून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भारतीय लष्काराच्या सुत्रांनी सांगितले आहे. परिस्थिती सामान्य व कंट्रोलमध्ये असल्याचेही म्हटले आहे.
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर थांबवण्यात आलेले आयपीएल सामने पुन्हा खेळवले जाणार आहेत. १७ मे नंतर हे सामने पुन्हा खेळवले जातील असे सूत्रांनी सांगितले. पुढील सामने एकूण ६ शहरामध्ये होतील यामध्ये १७ सामने खेळवले जातील तर ३ जूनला फायनल मॅच होईल.
जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन्स दिसले आहेत. पण अगदी कमी प्रमाणात हे ड्रोन असल्याने यामध्ये घाबरण्यासारखे काहीही नाही असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.
अमृतसरमध्ये ब्लॅकाऊट करण्यात आला आहे. अमृतसरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे की, तुम्हाला सायरन ऐकू येईल. आम्ही सतर्क आहोत आणि ब्लॅकआउट सुरू करत आहोत. कृपया तुमच्या घरातील दिवे बंद करा आणि खिडक्यांपासून दूर राहा. शांत राहा, वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याबाबत आम्ही लवकरच कळवू. घाबरू नका. हा खबरदारीचा उपाय म्हणून केलेली कार्यवाही आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संचालन महासंचालकांदरम्यान (DGMOs) १२ मे २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर एकही गोळी न झाडणे किंवा कोणतीही आक्रमक किंवा शत्रुत्वाची कृती न करण्याच्या प्रतिबद्धतेच्या पालनासंबंधी मुद्द्यांवर चर्चा झाली.
याशिवाय, दोन्ही बाजूंनी सीमारेषा आणि पुढील भागांमधून सैन्य कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे मान्य केले: भारतीय लष्कर.
भारताच्या सेनेने पाकिस्तानध्ये आंतकी ठिकाणांवर त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर सटीक प्रहार केला. पाकिस्तानने विचार केला नसेल भारत एवढे मोठे पाऊल उचलले. पण नेशन फर्स्ट ने असे पोलादी फैसले घेतले जातात. आंतकवादी ठिकाणे एक प्रकारे ग्लोबल टेरिरीजम चे विद्यापीठ राहिले आहेत. ९ ११ असुदे किंवा २६ ११ असूदे यांचा थेट संबध या पाकिस्तानस्थित दहशतवाद्याच्या तळाशी जोडले आहेत.
ऑपरेशन सिंदूर राबविण्यात भारताच्या सर्व सेनादलांनी केलेल्या यशस्वी प्रयत्नांबद्दल मी सर्व भारताच्यावतीने त्यांचे आभार मानतो. देशाच्या सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याचे अभिनंदन करतो असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ते देशवासियांशी संवाद साधत आहेत.
भारत पाकिस्तान युद्धासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले मत मांडले आहे. हे युद्ध थांबविल्याबद्दल मला गर्व आहे असे विधान ट्रम्प यांनी केले आहे. दोन्ही देशांकडे अणुबाँम्ब आहेत त्यामुळे हे युद्ध थांबविण्यासाठी मी मदत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी याबाबत मोदी काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
भारत पाकिस्तानमध्ये अमेरिकेने मध्यस्थी का केली याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. शिमला करारानुसार दोन्ही देशांच्या प्रश्नात तिसरा देश बोलू शकत नाही. किंवा तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करता येणार नाही, असे ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनी म्हटले आहे.
पवार म्हणाले, मी संसदेसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याच्या विरोधात नाही. पण हे एक संवेदनशील आणि गंभीर प्रकरण आहे, आणि अशा गंभीर मुद्द्यांवर संसदेत चर्चा करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत, राष्ट्रीय हितासाठी माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक आहे.
विशेष अधिवेशन बोलावण्याऐवजी, आपण सर्वांनी एकत्र बसून (सर्वपक्षीय बैठक) चर्चा केली तर ते अधिक योग्य ठरेल."
ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत पाकिस्तान यामधील शस्त्रसंधीनंतर आता आज सोमवारी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाशी संवाद साधणार आहेत.
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई पुढे म्हणाले, "आमची एअरफील्ड्स सर्व प्रकारे कार्यान्वित आहेत. पाकिस्तानने ड्रोन आणि शस्त्रास्त्रयुक्त यूएव्हीद्वारे केलेला हल्ला आमच्या एअर डिफेन्स ग्रिडने हाणू पाडला. पाकिस्तानचे उर्वरित ड्रोन आमच्या खांद्यावर चालवणाऱ्या शस्त्रांनी पाडले. याबद्दल मी आमच्या सीमा सुरक्षा दलाचेदेखील कौतुक करू इच्छितो. डायरेक्टर जनरल ते सीमेवरील जवानापर्यंत सर्वांचा ऑपरेशन सिंदूरमध्ये सक्रियपणे भाग राहिला. त्यांनी आम्हाला खूप धैर्याने साथ दिली."
हवाई संरक्षण यंत्रणेने चीन निर्मित पीएल-१५ क्षेपणास्त्र कसे पाडले? हे स्क्रीनवर दाखवण्यात आले. याबाबत बोलताना डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले की, पीएल-१५ क्षेपणास्त्राचे लक्ष्य चुकले. त्याचे तुकडे तुम्ही पाहू शकता. आणखी एक सापडलेले शस्त्र म्हणजे लांब पल्ल्याचे रॉकेट. हे सर्व आमच्या प्रशिक्षित क्रू आणि हवाई संरक्षण प्रणालीने पाडले आहे.
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, "गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलले आहे. निष्पाप नागरिकांवर हल्ले करण्यात आले. 'पहलगाम तक पाप का ये घडा भर चुका था'..."
एअर मार्शल ए. के. भारती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "दहशतवाद्यांची साथ देणाऱ्या पाकिस्तानला आमच्या प्रत्युत्तराचा सामना करावा लागला. आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आमची लढाई दहशतवाद्यांशी आणि त्यांनी उभारलेल्या आधारभूत पायाभूत सुविधांशी आहे. पाकिस्तानी सैन्यांशी नाही. पण पाकिस्तानी सैन्याने हस्तक्षेप करून दहशतवाद्यांची साथ दिली ज्यामुळे आम्हालाही चोख प्रत्युत्तर द्यावे लागले."
त्यांच्या नुकसानीला स्वतः पाकिस्तानच जबाबदार आहे. पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांची साथ दिली. म्हणूनच आम्ही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला, असे एअर मार्शल ए. के. भारती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ७, एलकेएम येथे बैठक होत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस, तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी किमान 10 उपग्रह 24 तास सतत कार्यरत आहेत. त्यांनी मणिपूरमधील इंफाळ येथे पार पडलेल्या सेंट्रल अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीच्या पाचव्या दीक्षांत समारंभात ही माहिती दिली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या समझोत्याबद्दल अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एएनआयला सांगितले की, "शांतीचा मार्ग निवडल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि शरीफ यांचे कौतुक करतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि सचिव रुबियो दोन्ही देशांना पूर्ण युद्धविराम राखण्याचे आणि थेट संवाद साधण्याचे आवाहन करत आहेत. भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी चर्चा सुलभ करण्यासाठी अमेरिका आपला पाठिंबा देत आहे."
संरक्षण तज्ज्ञ संजीव श्रीवास्तव यांनी ANIशी बोलताना सांगितले की, " आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'डीजीएमओ' स्तरावरील चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. या बैठकीत भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या समझोत्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. ही चर्चा पुढे सुरु ठेवायची का, याबाबतही आज भारत निर्णय घेईल. पाकिस्तान पुन्हा समझोत्याचे उल्लंघन करणार नाही आणि पुन्हा कोणतेही चिथावणीखोर पाऊल उचलणार नाही, याकडे भारताचे विशेष लक्ष असेल."
रविवारी (दि. ११ मे) सकाळी सीमेला लागून असलेल्या राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती सामान्य दिसून आली. बाजारपेठा उघडल्या, व्यवहार सामान्य राहिले. दरम्यान, भारतीय हवाई दलाने सांगितले की, आम्ही ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट साध्य केले आहे. हे ऑपरेशन अजूनही चालू आहे. वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला माहिती देऊ. अफवा टाळण्याचे आवाहन हवाई दलाने केले आहे. ऑपरेशन सिंदूर (७ मे) सुरू झाल्यापासून ते १० मे पर्यंत, पाकिस्तानी गोळीबारात ७ सैनिक (५ सशस्त्र दल, २ बीएसएफ) शहीद झाले आहेत, तर ६० जण जखमी झाले आहेत. याशिवाय २७ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज (दि. १२ मे) दुपारी १२ वाजता भारत आणि पाकिस्तानमध्ये डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) चर्चा होणार आहे. वृत्तसंस्था 'एएनआय'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, युद्धबंदीनंतर फक्त पाकिस्तानच्या डीजीएमओशीच चर्चा केली जाईल. अन्य कोणताही देश देश या चर्चेत सहभागी होणार नाही.
Operation Sindoor Live Updates | पाकिस्तानकडून शनिवारी युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले आहे. भारतीय सैन्य परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तिन्ही सैन्य दलांना ठोस पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) चर्चा होणार आहे. जाणून घेवूया लाईव्ह अपडेट...