नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सीमेपलीकडून होणारा दहशतवाद समाप्त होईपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहील आणि पाकिस्तानशी केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा होईल’ होईल, असे म्हणत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानसोबतच्या चर्चेबाबत भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदीच्या घोषणेनंतर डीजीएमओ स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही देशांमधील तणावाचे भवितव्य या संवादावर अवलंबून आहे. दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हे महत्वाचे वक्तव्य केले. गुरुवारी दिल्लीतील होंडुरास दूतावासाच्या उद्घाटनादरम्यान एस. जयशंकर बोलत होते.
एस. जयशंकर म्हणाले की, सिंधू करार स्थगितच राहील. पाकिस्तानशी दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा होईल. काश्मीरवर चर्चा करायची असलेली एकमेव गोष्ट म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय भूभाग पाकिस्तानने रिकामा करणे, आम्ही त्या चर्चेसाठी तयार आहोत, या चर्चेत कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या वक्तव्यानंतर एस. जयशंकर यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जाते. एस. जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानशी आमचे व्यवहार पूर्णपणे द्विपक्षीय असतील. यावर वर्षानुवर्षे राष्ट्रीय एकमत आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही. पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे की पाकिस्तानशी चर्चा फक्त दहशतवादावरच आणि पाकव्याप्त काश्मीरवरच होईल. तसेच पाकिस्तानकडे दहशतवाद्यांची यादी आहे. पाकिस्तानला दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा बंद कराव्या लागतील, असे म्हणत पाकिस्तानला थेट इशाराही त्यांनी दिला.
राजधानी दिल्लीत होंडुरास दूतावासाचे गुरूवारी उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी होंडुरासचे कौतूक केले. आमच्यासाठी होंडुरासचा नवीन दूतावास असणे ही खूप मोठी गोष्ट आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ज्या देशांनी दृढ एकता व्यक्त केली त्यापैकी होंडुरास एक आहे. मी त्याचे कौतुक करतो, असेही एस. जयशंकर म्हणाले.