Operation Sindoor 
राष्ट्रीय

Operation Sindoor India Pakistan Tensions | भारताने LoC जवळील दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त, पाकिस्तानचा थरकाप, पाहा Video

दहशतवादी पायाभूत सुविधा केल्या नष्ट, भारतीय सैन्याने जारी केला व्हिडिओ

दीपक दि. भांदिगरे

Operation Sindoor India Pakistan Tensions

जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील अनेक भागांत पाकिस्तानने केलेले ड्रोन हल्ले भारतीय सैन्याने हाणून पाडले. भारतीय सैन्याने ८ आणि ९ मे दरम्यान रात्री नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी लाँच पॅडवर अचूक गोळीबार करून ते उद्ध्वस्त केले, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईचा व्हिडिओ X वर शेअर करण्यात आला आहे.

अतिरिक्त सार्वजनिक माहिती महासंचालनालयाने (ADG PI) X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, या कारवाईत दहशतवादी लाँच पॅड यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले. नियंत्रण रेषेजवळ (LOC) असलेल्या या दहशतवादी लाँच पॅडचा वापर भारतीय नागरिक आणि सुरक्षा दलांविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि प्रत्यक्ष हल्ला करण्यासाठी केला जात होता. भारतीय लष्कराने त्यावर केलेल्या जलद आणि निर्णायक कारवाईमुळे दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट झाली असून त्यांच्या क्षमतांना मोठा धक्का बसला.

दरम्यान, भारतीय लष्कराने शनिवारी पहाटे पाकिस्तानचे ड्रोन हल्ले यशस्वीरित्या रोखले. पाकिस्तानी सैन्याने आपले सैन्य फॉरवर्ड लोकेशनवर हलवणे सुरूच ठेवले असल्याचे शनिवारी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वरील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

"गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले वाढले आहेत. प्रत्युत्तरादाखल भारतान त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले आहेत," असे मिस्री म्हणाले. दरम्यान, पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्याचे पाकिस्तानचे आरोप भारताने फेटाळून लावले आहेत.

पाकिस्तानने श्रीनगर ते छल्लियापर्यंत २६ ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लष्करी रुग्णालये, नागरी पायाभूत सुविधा आणि लष्करी स्थळांवर हल्ला केला, असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.

अमृतसर, पंजाबच्या दिशेने केलेले ड्रोन हल्ले हाणून पाडले

आज पहाटेच्या सुमारास, पाकिस्तानी सैन्याने दाट लोकवस्ती असलेल्या रहिवाशी भागात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अमृतसर, पंजाबच्या दिशेने आंतरराष्ट्रीय सीमेवरून अनेक बायकर YIHAIII कामिकाझे ड्रोन सोडले. पण भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण (एएडी) नेटवर्कच्या दक्षतेमुळे आणि जलद दिलेल्या प्रतिसादामुळे ते शोधून पाडण्यात आले.

"पाकिस्तानी सैन्याकडून पश्चिम सीमेवर सतत हल्ले सुरु आहेत; त्यांनी भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला. पण भारताने त्याचे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. पाकिस्तानने २६ हून अधिक ठिकाणी हवाई मार्गाने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांनी उधमपूर, भूज, पठाणकोट, भठिंडा येथील हवाई दलाच्या तळांवरील उपकरणांचे नुकसान आणि जीवितहानी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पहाटे १:४० वाजता पंजाबच्या हवाई तळाला लक्ष्य करण्यासाठी हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केला," असे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT