Soldiers target Karegutta hill occupied by Naxalites
पुढारी ऑनलाईन :
नक्षलवाद्यांनी व्यापलेल्या तीन टेकड्यांपैकी दोन टेकड्या जवानांनी ताब्यात घेतल्या आहेत. सैनिकांचे पुढील लक्ष्य करेगुट्टा टेकडी आहे, जिथे देशातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी कमांडर लपले असू शकतात असा अंदाज आहे.
छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर नक्षलवाद्यांवर सुरू असलेल्या सर्वात मोठ्या कारवाईत जवानांना मोठे यश मिळाले आहे. हजारो जवानांनी वेढलेली करेगुट्टा टेकडी, त्याच्या शेजारी असलेल्या धोबी टेकड्या देखील जवानांनी ताब्यात घेतल्या आहेत.
या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ऑपरेशन सुरू झाल्यापासून आज ९ वा दिवस आहे. ९ व्या दिवशी, करेगुट्टा टेकडीजवळ असलेल्या धोबेच्या दोन टेकड्या, ज्या आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या ताब्यात होत्या, जवानांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. हे उल्लेखनीय आहे. याआधी सैनिकांनी नीलम सराईची टेकडी देखील ताब्यात घेतली होती. यानंतर, धोबेच्या दोन टेकड्या ताब्यात घेणे हे ऑपरेशनचे मोठे यश मानले जात आहे.
छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातील नक्षल्यांचे अतिसुरक्षित ठिकाण म्हणून ओळख असलेल्या करेगुट्टा पहाडाला दोन्ही राज्यांच्या सुमारे 10 हजारांहून अधिक जवानांनी मागील ९ दिवसांपासून वेढा घातला आहे. तेथे झालेल्या चकमकीत आतापर्यंत तीन नक्षली महिलांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. मृत नक्षल्यांचा आकडा 20 हून अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रातील नक्षल प्रभावित गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील सशस्त्र नक्षली जवळपास संपले आहेत. तेलंगणामध्येही मोजके नक्षली शिल्लक असून, त्यांच्या कारवाया बर्याच दिवसांपासून थंडावल्या आहेत. मात्र, छत्तीसगड राज्य हे सर्वाधिक नक्षल प्रभावित राज्य असून, तेथील सुकमा, दंतेवाडा व बिजापूर या तीन जिल्ह्यांमध्ये नक्षली कारवाया मोठ्या प्रमाणावर होत असतात. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 अखेर छत्तीसगडमधील नक्षल्यांचा समूळ नाश करणार असल्याचा अनेकदा पुनरुच्चार केला आहे.
अभियानावर असलेल्या जवानांना कडक उन्हात पायपीट करावी लागत असल्याने त्यांना प्रचंड त्रास होत आहे. आतापर्यंत ५० हून अधिक जवानांना उष्माघात झाल्याने त्यांना तेलंगणा राज्यातील भद्राचलम व अन्य ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृती बिघडल्यास जवानांची दुसरी तुकडी तयार ठेवण्यात आली आहे.