प्रातिनिधक छायाचित्र.  File Photo
राष्ट्रीय

Jagannath Rath Yatra : जगन्नाथ रथयात्रेत पुन्‍हा चेंगराचेंगरी : तिघा भाविकांचा मृत्यू, ५० जखमी

दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी, मृतांमध्‍ये दोन महिलांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

ओडिशातील पुरी येथे रथयात्रेदरम्यान आज (दि.२९ जून) पहाटे पुन्‍हा एकदा चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. दोन महिलांसह तिघा भाविकांचा मृत्यू झाला असून, ५० जण जखमी झाले आहेत. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे रथ, यात्रेचे उगमस्थान असलेल्या जगन्नाथ मंदिरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील श्री गुंडिचा मंदिराजवळ पोहोचले असता ही दुर्घटना घडली, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.

दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी

आज पहाटे सुमारे साडेचारच्या सुमारास, हे पवित्र रथ गुंडिचा मंदिराजवळ होते. दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. रथ जवळ येताच गर्दी आणखी वाढली, त्यात काही जण खाली पडले आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रभाती दास आणि बसंती साहू या दोन महिलांसह ७० वर्षीय प्रेमकांत मोहंती यांचा समावेश आहे. तिघेही ओडिशाच्या खुर्दा जिल्ह्यातील रहिवासी होते.

तीन मृत, सहा जणांची प्रकृती गंभीर

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेली व्यवस्था अपुरी होती. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुघटनेबाबत माहिती देताना पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ एस स्वैन यांनी सांगितले की, घटनेतील ५० जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख बसंती साहू (बोलागड), प्रेमकांत मोहंती आणि प्रवती दास (दोघेही रहिवासी बालीपटना) अशी आहे. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि जखमींना मदत करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

शुक्रवारी ६२५ भाविक अत्‍यवस्‍थ

शुक्रवारी पुरी येथे रथयात्रेदरम्यान काही लोकांनी गुदमरल्याची तक्रार केली होती. आर्द्रतेमुळे अनेक जण बेशुद्ध पडले. कडक उन्हामुळे आणि प्रचंड गर्दीमुळे सुमारे ६२५ भाविक अत्‍यवस्‍थ झाले. त्‍यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. प्रशासनाने दिलेल्‍या माहितीनुसार, बहुतेक लोकांना उलट्या, चक्कर येणे आणि किरकोळ दुखापतही झाली होती.

रथयात्रेला झालेल्या विलंबामुळे राजकीय वाद

यंदा रथयात्रेला प्रारंभ होण्यास झालेल्या विलंबामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. बिजू जनता दलाचे (BJD) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या प्रकाराला एक भयानक गोंधळ असे म्‍हटलं आहे. आपण फक्त प्रार्थनाच करू शकतो. या वर्षी या पवित्र उत्सवावर ज्यांच्यामुळे या भयानक गोंधळाची छाया पसरली आहे, त्या सर्वांना महाप्रभू जगन्नाथ क्षमा करोत, असा टोलाही त्‍यांनी सत्ताधारी भाजपला लगावला आहे. भूतकाळात, बिजू जनता दलाच्या सरकारने चुका करून भगवान जगन्नाथाचा अपमान केला होता. १९७७ पासून, रथ नेहमी दुसऱ्या दिवशी गुंडिचा मंदिरात पोहोचत आले आहेत, असे राज्‍याचे कायदामंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी म्‍हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT