लंडन : सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये सुंदर आणि भव्य हिंदू मंदिरे उभी राहिलेली आहेत. आता लंडनमधील 'ओडिया सोसायटी ऑफ यूके' इंग्लंडच्या या राजधानीत भगवान जगन्नाथांचे एक भव्य मंदिर उभे करणार आहे. हे मंदिर हुबेहूब ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरासारखेच असेल. या मंदिरासाठी सुमारे 40 कोटी रुपये खर्च येणार आहे.
सध्या ग्रेटर लंडनमध्ये या मंदिरासाठी जमीन शोधली जात आहे. दहा ते बारा एकर जमिनीवर हे मंदिर उभे केले जाईल. या मंदिरात ओडिया संस्कृतीशी निगडीत वस्तूही पाहायला मिळतील. याबाबत सोसायटीने पुरीचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे मार्गदर्शन घेतले आहे. 2024 पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याची योजना आहे. लंडनमध्ये सध्याही एक जगन्नाथ मंदिर आहे; पण त्याचा आकार लहान आहे. बि—टनमध्ये हिंदू मंदिरांची संख्या मोठी म्हणजे सुमारे 210 इतकी आहे. ग्रेटर लंडनमध्येही सध्या 35 मंदिरे आहेत. त्यामध्ये स्वामीनारायण संप्रदाय, इस्कॉन (हरे कृष्ण संप्रदाय), रामकृष्ण मिशनसह अन्यही अनेक संप्रदायांच्या मंदिरांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, इटली, अमेरिका, रशिया आणि मॉरिशससह अनेक देशांमध्येही जगन्नाथ मंदिरे आहेत. याठिकाणी जगन्नाथ रथयात्रेचेही आयोजन केले जात असते.