पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या पाच वर्षांत मी माझी दिनचर्या बदलली, आता मला कोणतीही औषधांची गरज भासत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. दररोज 2 तास व्यायाम आणि 6 तास झोप अनिवार्य आहे, असेही ते म्हणाले.
नवी दिल्लीत ‘वर्ल्ड लिव्हर डे’ निमित्त इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बायिलरी सायन्सेस (ILBS) तर्फे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अमित शहा म्हणाले, "जर देशातील तरुणांना आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त राहायचं असेल, तर त्यांना स्वतःच्या दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. हे मी वैयक्तिक अनुभवावरून सांगतोय.
आपल्याला अजून 40-50 वर्षे देशासाठी काम करायचं आहे. त्यामुळे मी सर्व तरुणांना विनंती करतो की, दररोज दोन तास शरीरासाठी व्यायाम आणि सहा तास मनासाठी शांत झोप घ्या.
अमित शहा म्हणाले, "मे 2020 पासून मी माझ्या जीवनशैलीत मोठे बदल केले आहेत. योग्य प्रमाणात झोप, पाणी, आहार आणि नियमित व्यायाम यामुळे आज मी कोणत्याही ॲलोपॅथिक औषधांशिवाय, इन्सुलिनशिवाय जगतो आहे. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि तोच इथे शेअर करण्यासाठी मी आलो आहे."
दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थित दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, "लिव्हर डेच्या निमित्ताने आपण संकल्प करूया की, देशात कोणालाही आरोग्य सेवेसाठी संघर्ष करावा लागू नये.
दिल्ली केवळ येथील लोकांपुरती नाही, देशभरातून व विदेशातून देखील लोक येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे राजधानीचं आरोग्य सुदृढ करणं ही आपली जबाबदारी आहे."
उपराज्यपालांनी केले दिल्ली सरकारचे कौतुक
दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना म्हणाले, "मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने आरोग्य क्षेत्राला प्राधान्य दिलं आहे. मागील सरकारच्या धोरणांमुळे जे नुकसान झालं, ते भरून काढण्यासाठी नवे पावले उचलली जात आहेत.
ILBS ही अशी एकमेव संस्था आहे जिला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) लिव्हर विकारांवर संशोधन करणाऱ्या सहयोगी केंद्राचा दर्जा मिळालेला आहे."