जात किंवा धर्माचा उल्लेख नसणारे प्रमाणपत्र मिळण्याची याचिकाकर्त्याची मागणी
न्यायमूर्तींनी दिला संविधानाच्या अनुच्छेद २५ चा हवाला
धर्मत्यागाच्या पुराव्यासह नवीन अर्ज करण्याचे दिले निर्देश
Madras High Court on No Caste Certificate
मदुराई : 'जात नाही, धर्म नाही' (No Caste, No Religion) प्रमाणपत्र मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तीला आधी औपचारिकपणे आपल्या धर्माचा त्याग करावा लागेल, असे स्पष्ट करत तमिळनाडूच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने धर्माचा उल्लेख नसणारे प्रमाणपत्र मागणारी याचिका फेटाळली.
आई-वडील हिंदू धर्माचे असले तरी, जात किंवा धर्माचा उल्लेख नसणारे प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठात दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती रामास्वामी यांच्या एकलपीठासमोर यावर सुनावणी झाली.
न्यायमूर्ती रामास्वामी यांनी यावेळी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २५ चा हवाला देत, या अंतर्गत असलेल्या सद्सद्विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्यामध्ये धर्म स्वीकारण्यासोबतच धर्मत्याग करण्याचा अधिकारही समाविष्ट असल्याचे नमूद केले. मात्र, प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वी हा त्याग स्पष्टपणे नोंदवणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले.
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले की, त्याने आपला धर्म त्यागला आहे का? याचिकाकर्त्याने याने नाही, असे उत्तर दिले. न्यायमूर्ती रामास्वामी यांनी टिप्पणी केली की, जोपर्यंत याचिकाकर्ता हिंदू रीतिरिवाजांनुसार आपला धर्म त्यागत नाही, तोपर्यंत जात आणि धर्म सोडून प्रमाणपत्र जारी करण्याच्या विनंतीवर विचार केला जाऊ शकत नाही.
धर्मत्यागाचा कोणताही पुरावा सादर करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने तहसीलदारांचा आदेश रद्द करण्यास नकार दिला. तसेच रिट याचिका फेटाळून लावली. त्याचबरोबर, न्यायालयाने याचिकाकर्त्याला आपला धर्म त्यागण्याचे आणि त्याबाबतचा पुरावा अधिकाऱ्यांसमोर सादर करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. धर्मत्यागाच्या पुराव्यासह नवीन अर्ज केला तर अधिकारी त्यावर विचार करू शकतात, असे न्यायमूर्ती रामास्वामी यांनी स्पष्ट केले.