नितीश कुमार File photo
राष्ट्रीय

Nitish Kumar : बिहारचे 'किंग' नितीशकुमारच, जाणून घ्‍या 'अजातशत्रू' नेत्‍याचे यंदाच्‍या निवडणुकीतील 'सत्ताकारण'

विधानसभा निवडणुकीत ७० पेक्षा अधिक जागांवर निर्णायक मुसंडी

पुढारी वृत्तसेवा

Bihar Election Result : २०२४ ऑगस्‍ट महिन्‍यात बिहारचे तत्‍कालीन राज्‍यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्‍या हस्‍ते एका पुस्‍तकाचे प्रकाशन झाले. या सोहळ्यात आर्लेकर यांनी मुख्‍यमंत्री नितीश कुमारांचे वर्णन 'अजातशत्रू' असे केले होते. राजकारणात राहून अजातशत्रू राहणे तसे कठीण; पण नितीशकुमारांनी हे कसब जाणलं. विरोधकांशीही सौहार्दपूर्ण संबंध ठेवत कोणाविरोधात अत्‍यंत हीन पातळीला जाणून टीका न करणे हे त्‍यांच्‍या आजवरचे राजकारणाचे वैशिष्‍ट राहिले. याच वैशिष्‍ट्याच्‍या जोरावर तब्‍बल २० वर्ष बिहारच्‍या सत्ताकारण त्‍यांनी आपला अमीट ठसा उमटवला. बिहार विधानसभा निवडणुकीच्‍या मतमोजणीत आज दुपारी साडेबारवाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार जेडीयू ७८ जागांवर आघाडीवर असून, नितीश कुमार हेच बिहारचे किंगमेकर असल्‍याचे पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट झाले आहे.

सलग चार निवडणुका गमावल्‍यानंतर मिळाला होता विजय

नितीश कुमार यांचा जेडीयू आणि भाजपला २००५ मध्‍ये प्रथम घवघवीत यश मिळाले. मात्र यापूर्वीच्‍या चार निवडणुका नितीश कुमारांना अपयश पाहावे लागले होते. बिहारच्‍या राजकारणात त्‍यांनी सुरुवातीला लालू प्रसाद यादव यांच्‍याबरोबर युती करत आपले स्‍थान पक्‍के केले. २००५ला सत्ता मिळवल्‍यानंतर मात्र नितीश कुमारांनी पुन्‍हा कधीच मागे वळून पाहिले नाही. विकास हेच आपल्‍या राजकारणाचा मुख्‍य गाभा असल्‍याचे सांगत त्‍यांनी जातनिहाय मतपेटीचे समीकरण अत्‍यंत चतुरईने संभाळले.

अपयशातून पुन्‍हा यशाकडे...

मागील निवडणुकीत नितीशकुमारांच्‍या संयुक्‍त जनता दल (जेडीयू) पक्षाला ४३ जागांवर समाधान मानावे लागले होते. भाजपने नितीश कुमारांचा पक्षाला संपवले, अशी टीकाही विरोधकांनी केली होती.विरोधकांकडून वारंवार 'पलटू राम' (वारंवार पक्ष बदलणारे) म्हणून लक्ष्य केले जात असतानाही, नितीश कुमार यांनी आपला आधार आणि मतपेढी नेहमीच मजबूत ठेवली यंदाच्‍या निवडणुकीत नितीश कुमारांच्‍या जेडीयूने ७० पेक्षा अधिक जागांवर जोरदार मुसंडी मारली आहे. बिहारच्‍या राजकारणाचे किंग आपणाच आहोत हे नितीशकुमारच पुन्‍हा एकदा सिद्‍ध केले आहे.

नितीश कुमार बिहारमधील रालोआचा चेहरा

नऊ महिन्यांच्या अल्प कालावधीचा अपवाद वगळता नितीश कुमार हे सलग २० वर्ष बिहारचे मुख्‍यमंत्री राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने नितीश कुमार हेच मुख्‍यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे जाहीर केले होते. आज त्‍यांनी निर्विवाद यश मिळवत बिहारमधील रालोआच्‍या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे.

४३ जागा तरीही मुख्‍यमंत्रीपद ठेवले कायम!

मागील विधानसभा निवडणूक नितीश कुमारांसाठी सत्त्‍वपरीक्षा पाहणारी ठरली. त्‍यांच्‍या जनता दल (संयुक्त) पक्षाला केवळ ४३ जागांवर समाधान मानावे लागले होते. तरीही सलग पाच वर्ष त्‍यांनु मुख्यमंत्रिपदावरील आपली पकड कायम ठेवली. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे नितीश कुमारांचा आत्‍मविश्‍वास वाढलाराजकारणात कोणीही कधीच कायमस्‍वरुपी मित्र वा शत्रू नसतो हे बिहारमध्‍ये वारंवार दिसते. नितीश कुमारांनी भाजपशी काडीमोड घेत महाआघाडीबरोबर सूत जळवले;पण एका रात्रीत सरकार बदलून पुन्‍हा भाजपशी घरोबा केला. एकीकडे मुख्‍यमंत्रीपदावरील पकड कायम ठेवत असताना त्‍यांच्‍या जनता दल (संयुक्त) पक्षाच्‍या जागा कमी होत होत्‍या. मात्र लोकसभा २०२४ निवडणुकीत त्‍यांच्‍या पक्षाचे १२ खासदार निवडून आले. याचवेळी भाजपला फटका बसला. केंद्रातील सत्तेसाठी नितीश कुमारांची मैत्री ही भाजपसाठी अनिवार्य ठरली. याच १२ खासदारांच्‍या आधारस्‍तंभावर पुन्‍हा एकदा बिहारमध्‍ये आपला दबदबा कायम ठेवण्‍यात नितीश कुमारांना यश आले.

मागील निवडणुकीतील चुका नितीश कुमारांनी टाळल्‍या

बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्‍वी यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी रालोआविरोधात जोरदार प्रचार केला. त्‍यांच्‍या सभांना उत्‍स्‍फूर्त प्रतिसादही मिळघला. मात्र मागील निवडणुकीतील चुका नितीश कुमारांनी टाळल्‍या. २०२० विधानसभा निवडणुकीत केवळ ४३ जागांवर जेडीयूला विजय मिळाला. त्‍याचे मुख्‍य कारण म्‍हणजे चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (एलजेपी) होता. कारण या पक्षामुळे तब्‍बल २८ मतदारसंघात एलजेपीमुळे जेडीपूचा पराभव झाला. एलजेपी भाजपच्या आशीर्वादाने ती निवडणूक लढवत असल्‍याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. या पक्षाने १४३ मतदारसंघात निवडणूक लढवत ५.८ टक्‍के मते घेतली होती. या निवडणुकीत रालोआबरोबर चिराग पासवान यांचा पक्षाला घेण्‍यात नितीश कुमार यशस्‍वी झाले. याचा मोठा फायदा निवडणुकीत दिसून आला. अजात शत्रू राजकीय नेत्‍यांने विरोधकांना पुन्‍हा एकदा विरोधी बाकावर बसण्‍यास भाग पाडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT