नितीन नवीन यांची २० जानेवारीपर्यंत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता 
राष्ट्रीय

BJP New President Nitin Nabin | नितीन नवीन यांची २० जानेवारीपर्यंत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता

कार्यकाळ जानेवारी २०२६ ते जानेवारी २०२९ पर्यंत राहणार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : नितीन नवीन यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून २० जानेवारीपर्यंत निवड होण्याची शक्यता आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यास ते या पदावर पोहोचणारे सर्वात तरुण व्यक्त ठरतील. त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ जानेवारी २०२६ ते जानेवारी २०२९ पर्यंत राहील. २०२९ मध्ये लोकसभा निवडणुका प्रस्तावित असल्याने त्यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो, असे समजते.

नितीन नवीन यांना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडण्यासाठीची प्रक्रिया १८ जानेवारी रोजी सुरु होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्ष देशभरातील प्रदेशाध्यक्षांना १५ जानेवारीनंतर दिल्लीला बोलावण्याची तयारी करत आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया १८ ते २० जानेवारी दरम्यान पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, २९ राज्यांमध्ये पक्ष संघटनेच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. या राज्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी नितीन नवीन यांच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्जांचा एक संच सादर करतील. याव्यतिरिक्त, भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य देखील नितीन नवीन यांच्या बाजूने एका वेगळ्या संचामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतील. सूत्रांनी सांगितले की, नितीन नवीन यांच्या समर्थनार्थ दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही स्वाक्षऱ्या असतील.

नितीन नवीन हे एकमेव उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने, भाजपचे मुख्य निवडणूक अधिकारी के. लक्ष्मण उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीची औपचारिक घोषणा करू शकतात. या प्रसंगी भाजपशासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, नितीन नवीन यांना १४ डिसेंबर रोजी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT