Nitin Gadkari : आता १० वर्षांनंतरही धावणार डिझेल वाहने? IIT दिल्लीच्या उपकरणाला हिरवा कंदील; किती असेल किंमत? file photo
राष्ट्रीय

Nitin Gadkari : आता १० वर्षांनंतरही धावणार डिझेल वाहने? IIT दिल्लीच्या उपकरणाला हिरवा कंदील; किती असेल किंमत?

जुन्या डिझेल वाहनांबाबत वाहनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

nitin gadkari accepts iit delhi developd machine reduce 90 percent pollution diesel vehicle

पुढारी ऑनलाईन : जुन्या डिझेल वाहनांबाबत वाहनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी IIT दिल्लीने विकसित केलेल्या विशेष उपकरणाला हिरवा कंदील दाखवला आहे. हे उपकरण जुन्या डिझेल वाहनांमधून होणारे प्रदूषण तब्बल ९० टक्क्यांपर्यंत कमी करू शकते.

दिल्लीसह देशातील इतर शहरांमध्ये जुन्या डिझेल वाहनांमुळे होणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. मात्र, आता सरकार जुन्या डिझेल वाहनांना पुन्हा रस्त्यावर धावण्याची परवानगी देऊ शकते. यामागे IIT दिल्लीने विकसित केलेले खास उपकरण कारणीभूत ठरू शकते. हे उपकरण जुन्या डिझेल वाहनांमधून होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात नियंत्रित करू शकते.

प्रदूषण ९० टक्क्यांपर्यंत कमी

IIT दिल्लीने विकसित केलेल्या या उपकरणाचे नाव रेट्रोफिट एमिशन कंट्रोल डिव्हाइस (RECD) असे आहे. वाहनाच्या धुरातून बाहेर पडणारे पार्टिक्युलेट मॅटर म्हणजेच सूक्ष्म कण हे उपकरण तब्बल ९० टक्क्यांपर्यंत नियंत्रित करू शकते. याशिवाय नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाणही ६० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत होऊ शकते.

याबाबत माहिती देताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, BS-III किंवा BS-IV वाहनांमध्ये हे उपकरण बसवण्यात आले, तर ही वाहने BS-VI वाहनांप्रमाणे प्रदूषणाच्या दृष्टीने अधिक चांगली कामगिरी करू शकतील.

उपकरणाची किंमत किती असू शकते?

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM)च्या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी सांगितले की, या उपकरणाची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे जुन्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळू शकतो आणि प्रत्येक जुने वाहन भंगारात काढण्याची गरज भासणार नाही.

गडकरी यांनी सांगितले की, जुने व्यावसायिक वाहन विकून नवीन वाहन खरेदी करणे अनेकांच्या खिशावर मोठा आर्थिक भार टाकते. मात्र, हे नवीन उपकरण फार महाग असणार नाही. त्याची किंमत अंदाजे ४,००० ते ५,००० रुपये असू शकते.

लवकरच ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड २२८ अंतर्गत यासंदर्भात मसुदा अधिसूचना जारी केली जाऊ शकते. या उपकरणाचा वापर डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरमध्येही करता येऊ शकतो. हे उपकरण प्रत्यक्ष वापराच्या चाचण्यांमध्येही यशस्वी ठरल्यास जुन्या डिझेल वाहनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

स्क्रॅपिंगबाबत गडकरी काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादक कंपन्यांना जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी दिले जाणारे प्रोत्साहन वाढवण्याचे आवाहन केले होते. यामुळे वाहनांची विक्री वाढण्यास आणि उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले होते.

SIAMच्या ६६व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना गडकरी म्हणाले होते की, वाहन स्क्रॅपिंगचा फायदा वाहन उत्पादक कंपन्यांनाच होणार आहे. यामुळे वाहनांची विक्री वाढेल, उत्पादन क्षमता वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT