Nirmala Sitharaman PM Called On GST :
केंद्र सरकारने नुकतेच वस्तू आणि सेवा कर अर्थात GST मध्ये मोठे बदल केले. पूर्वीचे चार GST स्लॅब कमी करून प्रमुख दोन स्लॅब ठेवण्यात आले. त्यामुळे याचा सामान्यांच्या खिशावरचा ताण कमी होईल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र केंद्र सरकारनं जीएसटीचा एकच स्लॅब असावा असे मत आठ वर्षापूर्वीच व्यक्त केलं होतं.
आता तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी अनेकवेळा जीएसटीच्या दरात बदल करण्यात आला होता. मात्र केंद्र सरकार जीएसटीचे स्लॅब कमी करण्यास उत्सुक नव्हतं. मात्र यावर्षी दिवाळीपूर्वी जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्यात आले. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक मोठे वक्तव्य केलं आहे.
निर्मला सीतारमण यांनी एका इंग्रजी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी जीएसटी स्लॅब घटवून जवळपास ४०० वस्तूंचे जीएसटी दर बदलण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, ' याबाबतचं आमचं काम हे आठवड्यापूर्वी किंवा १० दिवसापूर्वी सुरू झालं नव्हतं. केंद्रीय मंत्र्यांचा एक गट हा गेल्या दीड वर्षापासून जीएसटी दराचे सुसूत्रीकरण्यासाठी काम करत होता.'
त्या पुढे म्हणाल्या की, 'यापूर्वी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे या मंत्री गटाचे नेतृत्व करत होते. त्यानंतर बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरींनी धुरा खांद्यावर घेतली. जीएसटीचे स्लॅब कमी करण्याबाबतची चर्चा ही गेल्या डिसेंबर महिन्यात जेसलमेर इथं झालेल्या जीएसटी काऊन्सीलच्या बैठकीत झाली होती. मात्र त्यात पुढे कोणती प्रगती झाली नाही.'
वीम्यावरील जीएसटीबाबत सीतारमण म्हणाल्या, 'वीम्यावरील जीएसटीबाबत देखील समस्या होती. हा विषय संसदेत देखील चर्चेत आला होता. यावर आमचा मंत्रीगट काम करत होता.'
निर्मला सीतारमण यांनी पुढं सांगितलं की त्यांना पंतप्रधानांचा फोन आला. त्या म्हणाल्या, 'आठ महिन्यापूर्वी मला पंतप्रधानांचा फोन आला होता. हा फोन जेसलमेर जीएसटी काउन्सीलच्या बैठकीपूर्वी आला होता. त्यावेळी त्यांनी मला जीएसटीमध्ये काही त्रुटी आहेत. याकडे सुसूत्रीकरण करण्याच्या दृष्टीकरणातून बघण्यास देखील सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी जीएसटी दराबाबत काहीतरी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावेळी चर्चा केलेल्या डायरेक्ट टॅक्सबाबतची आठवण करून दिली.
यानंतर मी जीएसटीवर काम करण्यास सुरूवात केली. मी प्रत्येक वस्तू , सेवांवरच्या जीएसटीबाबत अभ्यास केला. त्यावेळी आमचा दृष्टीकोण स्पष्ट होता. आम्ही फक्त उत्पन्नाचं साधन म्हणून याकडे पाहिलं नाही. आम्ही याच्याकडे पारंपरिक वर्गिकरणाच्या दृष्टीकोणातून देखील पाहिलं नाही. वर्गिकरण वाणिज्याच्या दृष्टीकोणातून चांगलं असतं. मात्र कर प्रणाली लागू करताना वेगळा दृष्टीकोण ठेवावा लागतो.
यानंतर आम्ही जवळपास सर्व वस्तू आणि सेवा या ०, ५, आणि १८ टक्के श्रेणीत ठेवण्याचा निर्णय घेतला. आम्ही पंतप्रधानांकडे गेलो. निर्मला सीतारमण शेवटी म्हणाल्या, ही सर्व प्रक्रिया पार पाडत असताना आम्ही परीक्षा उत्तम मार्कांनी पास झाल्याची भावना होती.