'निमेसुलाईड' (Nimesulide) या वेदनाशामक औषधाला अधिक सुरक्षित पर्याय उपलब्ध असल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
Nimesulide painkiller ban
नवी दिल्ली : केंद्र सरकारने 'निमेसुलाईड' (Nimesulide) या वेदनाशामक औषधाच्या १०० मिग्रॅपेक्षा जास्त क्षमता असलेल्या सर्व 'ओरल फॉरम्युलेशन्स'वर (तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या किंवा द्रव) तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. ही औषधे मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचे सांगत सरकारने त्यांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर निर्बंध लादले आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी यासंदर्भात अधिसूचना जारी केली. "१०० मिग्रॅपेक्षा जास्त क्षमतेच्या निमेसुलाईड गोळ्यांच्या वापरामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, याची खात्री पटली आहे," असे मंत्रालयाने यात नमूद केले आहे. तसेच, या औषधाला अधिक सुरक्षित पर्याय उपलब्ध असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.
कायदेशीर कारवाई आणि तांत्रिक सल्ला ड्रग्ज टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्डाशी (DTAB) चर्चा केल्यानंतर, औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० च्या कलम २६-ए अंतर्गत ही बंदी लागू करण्यात आली आहे. नियमावलीत बदलाचे संकेत याच दिवशी मंत्रालयाने १९४५ च्या 'ड्रग्ज नियमावली'मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव देणारी स्वतंत्र अधिसूचनाही काढली आहे. या मसुद्यानुसार, नियमन अटींमधून सूट मिळालेल्या औषधांच्या 'शेड्युल के' (Schedule K) मधील एका विशिष्ट नोंदीतून 'सिरप' (Syrup) हा शब्द वगळण्याचा प्रस्ताव आहे. या बदलांमुळे बाधित होणाऱ्या घटकांकडून पुढील ३० दिवसांत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
प्राण्यांसाठीच्या वापरावर यापूर्वीच बंदी यापूर्वी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने प्राण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या निमेसुलाईडच्या सर्व प्रकारच्या उत्पादनांवर बंदी घातली होती. बरेली येथील 'इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या (IVRI) संशोधनात असे दिसून आले होते की, हे औषध गिधाडांसाठी अत्यंत विषारी आणि जीवघेणे ठरत आहे.