What is the NExT exam: भारतातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आता एक मोठा बदल घडणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) स्पष्ट केले की देशातील वैद्यकीय पदवीधरांसाठी नॅशनल एक्झिट टेस्ट (NExT) परीक्षा लागू करण्याची तयारी सुरू आहे. ही परीक्षा सध्याच्या NEET-PG ची जागा घेणार असून डॉक्टर होण्याची, वैद्यकीय व्यवसायाचा परवाना मिळवण्याची आणि PG प्रवेश घेण्याची संपूर्ण प्रक्रिया बदलणार आहे. मात्र, हा बदल लगेच होणार नाही.
आतापर्यंत भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी NEET परीक्षा ही MBBS आणि BDS कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जात होती. परंतु NMC च्या नव्या नियमानुसार, NExT परीक्षा आता केवळ प्रवेशासाठीच नाही, तर डॉक्टर बनण्यासाठी, मेडिकल लायसन्स मिळवण्यासाठी आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रवेशासाठी एकच परीक्षा असेल.
ही परीक्षा देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन एकसमान निकषांवर करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. आयोगाचा दावा आहे की यामुळे वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढेल आणि डॉक्टरांच्या पात्रतेत एकसमानता येईल.
NMC चे चेअरमन यांनी सांगितले की ही परीक्षा ऑगस्ट 2025 पासून लागू करण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता, पण तो सध्या स्थगित करण्यात आला आहे. आयोगाच्या मते, NExT लगेच लागू करण्याऐवजी तीन ते चार वर्षांपर्यंत मॉक टेस्ट आणि ट्रायल एग्झाम्स घेण्यात येतील.
या चाचण्यांमधून परीक्षेची रचना, अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद यांचे मूल्यांकन केले जाईल. सर्व खर्चाची जबाबदारी पूर्णपणे NMC उचलणार आहे.
ही परीक्षा लागू करण्याच्या प्रयत्नांना विद्यार्थ्यांनी आणि डॉक्टर संघटनांनी यापूर्वीही विरोध दर्शवला होता. 2019 मध्ये NMC ने 2019 च्या बॅचसाठी 2023 मध्ये NExT परीक्षा घेण्याची योजना आखली होती, परंतु विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर ती पुढे ढकलण्यात आली. विद्यार्थ्यांचे म्हणणे होते की ही परीक्षा NMC अधिनियम 2019 च्या काही तरतुदींविरोधात आहे आणि त्यामुळे शैक्षणिक ताण वाढेल.
जर NExT लागू झाली, तर NEET-PG, FMGE, आणि MBBS फाइनल इयर परीक्षा रद्द होतील.
नव्या पद्धतीनुसार, एमबीबीएस विद्यार्थ्यांना फाइनल इयरच्या परीक्षेऐवजी NExT परीक्षा द्यावी लागेल आणि त्याच गुणांच्या आधारे PG प्रवेश दिला जाईल. तसेच, परदेशातून एमबीबीएस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाही आता स्वतंत्र FMGE परीक्षा द्यावी लागणार नाही, ते भारतीय विद्यार्थ्यांसोबतच NExT मध्ये सहभागी होऊ शकतील.
NExT परीक्षा ही भारताच्या वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. यामुळे डॉक्टरांचे मूल्यांकन देशभरात एकाच निकषावर होईल, शिक्षणाच्या दर्जात सुधारणा होईल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल. मात्र, विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा किती न्याय्य आणि उपयुक्त ठरते, हे आगामी मॉक टेस्टनंतरच स्पष्ट होईल.