राष्ट्रीय

काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष ॲक्शनमोडमध्ये; २९ ऑक्टोबरला गुजरात दौऱ्यावर

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच मल्लिकार्जुन खरगे ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यांनी नुकतीच पक्षाच्या सुकाणू समितीची घोषणा केली. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस वर्किंग कमिटीचे (सीडब्ल्यूसी) सर्व सदस्यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. खरगे यांनी बुधवारी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सीडब्ल्यूसीच्या सर्वच सदस्यांनी परंपरेनुसार त्यांचे राजीनामे खरगे यांच्याकडे सुपूर्द केले.

पक्षांतर्गत नवीन अध्यक्षांच्या निवडीनंतर सीडब्ल्यूसी विसर्जित केली जाते. त्यानंतर सीडब्ल्यूसीच्या जागी पक्षाचे कामकाज चालवण्यासाठी सुकाणू समिती स्थापन केली जाते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) सरचिटणीस (संघटना) केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनूसार, सर्व सीडब्ल्यूसी सदस्य, एआयसीसी सरचिटणीस तसेच प्रभारींनी त्यांचे राजीनामे काँग्रेस अध्यक्षांकडे सुपूर्द केले आहेत.

खरगे यांनी बुधवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मुख्यालयालात पक्षाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांनी शशी थरूर यांचा पराभव करणाऱ्या खरगे यांना निवडणूक प्रमाणपत्र दिले. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खरगे २९ ऑक्टोबरला गुजरात दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण गुजरातमधील नवसारी येथे ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेसचा वारसा पुढे नेणे ही अभिमानाची बाब असल्याची भावना खरगे यांनी व्यक्त केली होती. पदावर नेमल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले. शिवाय सोनिया गांधींचे ब्लू प्रिंट पुढे नेण्याचे काम करू, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. माझ्यासाठी हा भावनिक क्षण आहे. एका सामान्य कामगार, कष्टकऱ्याच्या मुलाची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करून त्यांचा सन्मान केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. ब्लॉक अध्यक्षापासून सुरू झालेला प्रवास तुम्ही इथपर्यंत नेला आहे. आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाचे रक्षण करणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, अशी भावना खरगे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT