Earthquake : महाभूकंप येणार का? जपानच्या इशाऱ्यानंतर भारतात वाढली धडधड  File Photo
राष्ट्रीय

Earthquake : महाभूकंप येणार का? जपानच्या इशाऱ्यानंतर भारतात वाढली धडधड

जपानचा महाभूकंपाचा इशारा! भारताच्या नव्या नकाश्याने वाढवली चिंता

पुढारी वृत्तसेवा

new map of india big earthquake tsunami warning in japan can earthquake be predicted

पुढारी ऑनलाईन :

जपान हा असा देश आहे. जिथे वारंवार भूकंप येत असतात. या ठिकाणी छोटे-मोठे भूकंप येत असल्याने नागरिकांनाही तसे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय या ठिकाणच्या पायाभूत सुविधांमध्येही भूकंपाचा विचार करण्यात आलेला असतो. मात्र जपानच्या नव्या इशाऱ्याने जगाचे लक्ष वेधले आहे.

जपानमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपामुळे मोठी हानी झाली. त्यानंतर देशात महाभूकंप आणि सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. यामुळे केवळ जपानच नव्हे, तर भारतातही भूकंपाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भूकंपाची भविष्यवाणी खरंच करता येते का, असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जगातील अनेक देशांमध्ये वारंवार भूकंप होत असतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर विध्वंस होतो. मात्र काही दिवसांपूर्वी जपानने संभाव्य महाभूकंपाचा इशारा दिला. या भूकंपामुळे सुमारे 100 फूट उंचीची सुनामी येऊ शकते आणि मोठ्या किनारी भागात प्रचंड हानी होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या इशाऱ्याकडे वेधले गेले.

विशेष म्हणजे, जपान हा जगातील सर्वाधिक भूकंपरोधी देशांपैकी एक मानला जातो. तरीही महाभूकंप आणि सुनामीच्या या इशाऱ्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे की, भूकंपाची अचूक भविष्यवाणी प्रत्यक्षात शक्य आहे का? जपानच्या इशाऱ्यानंतर हिमालयातही अशाच प्रकारची आपत्ती येऊ शकते का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले.

हिमालयात मोठ्या भूकंपाचा धोका वाढला

भारतीय मानक ब्युरो (BIS) ने अलीकडेच जारी केलेल्या नव्या भूकंपीय नकाशामुळे भूकंपाच्या धोक्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या नव्या नकाशानुसार संपूर्ण हिमालयीन प्रदेश देशातील सर्वाधिक धोकादायक भूकंपीय क्षेत्र झोन 6 (रेड झोन) मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. हा झोन सर्वात उच्च धोक्याच्या श्रेणीत येतो.

पूर्वी हिमाचल प्रदेशातील काही भाग झोन 4 आणि झोन 5 मध्ये विभागले गेले होते. मात्र नव्या नकाशानुसार आता संपूर्ण प्रदेश अत्यंत संवेदनशील श्रेणीत ठेवण्यात आला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भविष्यात होऊ शकणाऱ्या मोठ्या भूकंपाची शक्यता लक्षात घेऊनच हा नकाशा तयार करण्यात आला आहे.

भारतातही महाभूकंप होऊ शकतो का?

भारतामध्ये मोठ्या भूकंपाचा इशारा देता येईल का, याबाबत शास्त्रज्ञांचे मत आहे की या प्रश्नाचे उत्तर केवळ “हो” किंवा “नाही” असे देणे खूपच सोपस्कर ठरेल. भारतातही भूकंपाचा धोका लक्षात घेऊन सावध राहण्याची गरज आहे, कारण लवकर मिळणारा इशारा अनेकांचे प्राण वाचवू शकतो.

यासंदर्भात आयआयटी रुरकी येथील पृथ्वी विज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. संदीप सिंह यांनी सांगितले की, “काही लोक म्हणतात की, हिमालयातही असा मोठा भूकंप येऊ शकतो, पण हा फक्त एक अंदाज आहे, अचूक भविष्यवाणी नाही.”

ते पुढे म्हणाले, “पृथ्वीचे वर्तन अत्यंत बदलणारे आहे. पृथ्वीमध्ये ताण कुठे वाढतो आहे, हे आपल्याला कळते; मात्र तो ताण नेमका कधी तुटेल आणि भूकंप कधी होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. भूकंप हे पृथ्वीच्या सतत चालू असलेल्या निर्मिती आणि विकृती प्रक्रियेचा एक भाग आहेत. भूवैज्ञानिक नोंदी दर्शवतात की अशा घटना पूर्वीपासून घडत आल्या आहेत. पुढे त्या किती मोठ्या प्रमाणावर घडतील, याची अचूक भविष्यवाणी करता येत नाही.”

हिमालयाबाबत विशेष चिंता का?

हिमालयाबाबत मोठ्या भूकंपाची चिंता यासाठी व्यक्त केली जाते कारण हिमालय हे जगातील सर्वात तरुण आणि सर्वाधिक विवर्तनिकदृष्ट्या सक्रिय पर्वतरांगांपैकी एक आहे. भारतीय आणि युरेशियन प्लेट्सच्या सततच्या धडकेमुळे या पर्वतरांगांची निर्मिती झाली आहे.

सध्या हे धडकणे एखाद्या ठराविक भागापुरतेच मर्यादित नाही, तर सुमारे 2,500 किलोमीटरपर्यंत पसरलेल्या भागात ही प्रक्रिया घडत आहे. या संपूर्ण पट्ट्यात भूकंपीय ताण दशकानुदशके किंवा शतकानुशतके साठत राहतो आणि तोच ताण पुढे जाऊन शक्तिशाली भूकंपांच्या रूपाने प्रकट होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT