

statue of liberty replica fallen down due to wind watch viral video
पुढारी ऑनलाईन
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रचंड वाऱ्यामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची प्रतिकृती कोसळताना दिसत आहे.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही अमेरिकेची ओळख आहे. त्यामुळे इतकी भव्य मूर्ती कोसळ्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र या पाठिमागच सत्य काय ते जाणून घेऊया.
दक्षिण ब्राझीलमध्ये जोरदार वाऱ्याच्या झोतामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची भव्य प्रतिकृती, म्हणजेच डुप्लिकेट मूर्ती कोसळली आहे. ही घटना रिओ ग्रांडे डो सुल महानगर क्षेत्रातील पोर्टो अॅलेग्रेजवळील गुआइबा शहरात घडली. अहवालानुसार, या घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाल्याची माहिती नाही.
ही घटना सोमवार, १५ डिसेंबर रोजी घडली. सुमारे २४ मीटर उंच असलेली ही प्रतिकृती हावन या रिटेल स्टोअरच्या पार्किंग परिसरात उभारण्यात आली होती. जोरदार वाऱ्यामुळे ही मूर्ती कोसळली असून, त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एक्सवर व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर @BGatesIsaPyscho या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये मूर्ती आधी झुकताना आणि नंतर जमिनीवर कोसळताना दिसते. याचवेळी शेजारच्या वर्दळीच्या रस्त्यावर वाहने सुरूच असल्याचेही पाहायला मिळते. ही प्रतिकृती एका फास्ट-फूड आउटलेटजवळ उभारण्यात आली होती.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये परिसरात जोरदार वाऱ्यामुळे झालेला कहर स्पष्टपणे दिसतो. काही वाहनचालक मूर्ती कोसळू लागल्याचे लक्षात येताच आपली वाहने तातडीने दूर नेताना दिसतात. नागरिक संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही रचना कोसळण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तांत्रिक मूल्यांकन केले जाईल.
आतापर्यंत कोणतीही जीवितहानी नाही
अहवालानुसार, ही मूर्ती हावन रिटेल चेनची होती. कंपनीने स्पष्ट केले की, घटनेच्या वेळी परिसर जवळपास रिकामा असल्यामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही. घटनेपूर्वीच स्थानिक नागरिक संरक्षण विभागाने जोरदार वाऱ्याचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला होता. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला होता. तसेच, वीज उपकरणे बंद ठेवणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवाजे व खिडक्या बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.