New Labor Codes
नवी दिल्ली : देशात कामगार कायद्यांच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी कामगार सुधारणा करत चार नव्या कामगार संहितांची अंमलबजावणी केली आहे. यांतर्गत २९ जुने आणि गुंतागुंतीचे कायदे रद्द करून त्यांना चार सोप्या संहितांमध्ये एकत्र करण्यात आले आहे.
वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाची अट संहिता अशा या चार संहिता आहेत. या नवीन कामगार संहितांमुळे लोकांच्या पगाराच्या रचनेतही बदल होणार आहे.
आता, कर्मचाऱ्याच्या पगाराच्या किमान ५०% रक्कम मूळ पगार असेल. हा नियम 'मजुरी संहिता' अंतर्गत लागू करण्यात आला आहे. याचा अर्थ भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि ग्रॅच्युइटीमध्ये जाणारी रक्कम वाढेल. एकूण पगार तेवढाच राहणार असल्याने, पीएफ आणि ग्रॅच्युइटीमध्ये जास्त रक्कम जमा झाल्यास, कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा मासिक पगार मात्र थोडा कमी होईल.
हा नियम शुक्रवारपासून लागू झाला असला तरी, सरकार पुढील ४५ दिवसांत यासंबंधीचे सविस्तर नियम जाहीर करणार आहे. त्यानंतर कंपन्यांना त्यांच्या सध्याच्या वेतन रचनेत आवश्यक ते बदल करून या नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.