नवी दिल्ली : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) अचानक आलेल्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात धुळीची चादर पसरली आहे. या धुळीमुळे दिल्ली विमानतळावरील दृश्यमानतेवरही परिणाम झाला आहे. धुळीमुळे सकाळी १० ते ११:३० दरम्यान विमानतळावरील दृश्यमानता ४५०० मीटरवरून १२०० मीटरपर्यंत घसरली होती. बुधवारी रात्री जोरदार वादळ आल्यामुळे असे झाल्याचे समजते.
दिल्ली एनसीआरमध्ये अचानक हवामान बदलले. जोरदार वाऱ्यामुळे आकाशात धुळीचे लोट दिसू लागले आहेत. दिल्लीच्या बहुतांश भागात धुळीची चादर पसरली आहे. दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमध्ये धुळीची चादर पसरल्यामुळे दृश्यमानता कमी झाली आणि लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. धुळीमुळे लोकांना रस्त्यावर चालणे, वाहणे चालवण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे.
उत्तर-दक्षिणेत उच्च दाबामुळे बुधवारी रात्रीपासून गुरूवारच्या सकाळपर्यंत पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर राजस्थानवर ३०-४० किमी प्रतितास वेगाने धुळीचे वारे वाहत होते. या जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे दक्षिण पंजाब आणि दक्षिण हरियाणा मार्गे धूळ दिल्ली-एनसीआरमध्ये पोहोचली. परिणामी दृश्यमानता कमी झाली आणि या काळात दिल्ली विमानतळावर १२०० मीटर एवढी सर्वात कमी दृश्यमानता नोंदवली गेली.
धुक्यामुळे दैनंदिन जीवन आणि हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक गुरूवारी सकाळी ८ वाजता २३६ तर सकाळी १० वाजता २४९ वर म्हणजे वाईट श्रेणीत पोहोचला होता. हवामान खात्याने गुरुवार आणि आठवड्याच्या शेवटी जोरदार वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शुक्रवारी पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे. पाऊस आल्यास धुळीपासून आराम मिळू शकेल.