राष्ट्रीय

Nepal Flood : शेजार धर्माचे पालन! 'नेपाळ'च्या मदतीसाठी भारताचा पुढाकार; १० टन आपत्कालीन सामग्री आणि औषधांचा पुरवठा रवाना

नेपाळमधील जलप्रलयामुळे बिहार अलर्टवर; NDRFच्या तुकड्या तैनात, PM मोदींनी साधला नेपाळी पंतप्रधानांशी संवाद

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली / काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनाच्या संकटात मदतीचा हात पुढे करत भारताने १० टन आपत्कालीन मदत सामग्री आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा नेपाळला रवाना केला आहे. परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, या कठीण प्रसंगी भारत नेपाळसोबत ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी सर्व प्रकारची मानवतावादी मदत देण्याची ग्वाही दिली. "या कठीण काळात भारत नेपाळमधील बंधू-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच दोन्ही देशांची बचाव पथके परस्परांशी समन्वय साधून कार्य करत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

हवाई दलामार्फत मदत, एनडीआरएफ पथके सज्ज

भारताच्या ‘मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण’ (HADR) उपक्रमांतर्गत भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे ही मदत पाठवली जात आहे. यामध्ये अत्यावश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि अन्नधान्याचा समावेश आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बाधित भागात मदत व बचाव कार्याला गती देण्यासाठी 'राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला'ची (NDRF) पथके पाठवण्याची तयारीही केंद्र सरकारने पूर्ण केली आहे.

बिहारमध्ये पुराचा धोका; केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा

नेपाळमधील अतिवृष्टी आणि हिमनदी फुटल्याच्या घटनांमुळे सीमेला लागून असलेल्या बिहारमध्येही पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले. खबरदारीचा उपाय म्हणून बिहारमध्ये 'एनडीआरएफ'च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून राज्य प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बेपत्ता भारतीयांचा शोध घेऊन सुरक्षित आणावे: राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेपाळमधील पूरस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करताना ते म्हणाले, "या पुरात अनेक भारतीय भाविकांसह शेकडो लोक बेपत्ता आहेत. केंद्र सरकारने नेपाळ प्रशासनाशी समन्वय साधून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित परतीसाठी तातडीने युद्धपातळीवर पावले उचलावीत."

भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन जारी

काठमांडू येथील भारतीय दूतावासाने नागरिकांच्या मदतीसाठी २४ तास सुरू असणारे आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत:

  • भारतीय दूतावास हेल्पलाईन : +977 9851316807, +977 9709107500

  • नेपाळ पर्यटन मंडळ टोल-फ्री क्रमांक : 1234

  • हॉटलाईन क्रमांक : 1144

  • पर्यटक पोलीस क्रमांक : 9851289445

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT