NEET UG 2026 file photo
राष्ट्रीय

NEET UG Result 2026: नीट परीक्षेचा निकाल जाहीर: १३८ विद्यार्थ्यांना ६९० पेक्षा अधिक गुण, पाहा टॉपर्सची संपूर्ण यादी

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET UG २०२६ चा निकाल जाहीर केला असून, देशभरातील पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशांसाठी ११.२१ लाख उमेदवार पात्र ठरले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

NEET UG Result 2026

नवी दिल्ली: राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) नीट-युजी २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर केला असून, देशभरातील पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशांसाठी ११.२१ लाख उमेदवार पात्र ठरले आहेत. भारतातील ५५१ शहरे आणि परदेशातील १४ शहरांमधील ५,४४० केंद्रांवर घेण्यात आलेल्या या प्रवेश परीक्षेला सुमारे २० लाख उमेदवार बसले होते. पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बन्सल यांनी संयुक्तपणे ७२० पैकी ७१५ गुणांसह देशात अव्वल स्थान पटकावले आहे.

NTA च्या माहितीनुसार, १३८ उमेदवारांनी ७२० पैकी ६९० किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत, तर १९ उमेदवारांनी ७०० हून अधिक गुण प्राप्त केले आहेत. पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बन्सल यांनी संयुक्तपणे ७१५ गुणांसह सर्वोच्च गुण मिळवले. अधिकृत आकडेवारीनुसार, पात्र उमेदवारांपैकी ५८ टक्क्यांहून अधिक मुली आहेत.

६९० पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी

देशातील ६६ शहरांतील १३८ विद्यार्थ्यांनी ६९० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. त्यापैकी ९३ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी प्रथमच नीट परीक्षा देणारे होते, तर ९९ टक्के विद्यार्थ्यांचे वय १७ ते १९ वर्षांदरम्यान असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे. याशिवाय, १७ राज्यांतील अव्वल विद्यार्थ्यांनी ७०० किंवा त्यापेक्षा अधिक गुण, तर २६ राज्यांतील टॉपर्सनी ६९० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.

प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या

नीटमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवर्गनिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे :

जनरल: २.९१ लाख

OBC-NCL: ५.१२ लाख

SC: १.५९ लाख

ST: ६३,७१६

Gen-EWS: ९५,०२६

PwBD: ३,६६६

PwD: ३०३

कट-ऑफ आणि टॉपर यादीही प्रसिद्ध

निकालासोबतच एनटीएने प्रवर्गनिहाय टॉपर, राज्यनिहाय अव्वल विद्यार्थी, कट-ऑफ गुण आणि गुणांचे सविस्तर वितरण देखील प्रसिद्ध केले आहे. उमेदवार आता त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात आणि एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि संबंधित वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT