supreme court  File Photo
राष्ट्रीय

नीट परीक्षा पेपर ४ मे पूर्वीच फुटला होता : सरन्‍यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिप्पणी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतल्‍या जाणार्‍या NEET-UG 24 परीक्षा ५ मे रोजी होती. पेपरफुटी प्रकरणी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीने दिलेल्‍या जबाबावरुन तो परीक्षेच्‍या आधी एक दिवस म्‍हणजे ४ मेच्‍या रात्री विद्यार्थ्यांना गोळा करत होता. यावरुन असे सूचित होते की, विद्यार्थ्यांना ४ मेच्‍या रात्रीच उत्तरे लक्षात ठेवण्यास सांगितले जात होते याचा अर्थ नीट परीक्षाचा पेपर ४ मे पूर्वीच फुटला होता हे स्‍पष्‍ट होते, अशी महत्त्‍वपूर्ण टिप्‍पणी आज ( दि. २२) सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली.

वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतल्‍या जाणार्‍या NEET-UG 24 परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज (दि.२२) सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुरु आहे.

केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकालाच्‍या आकडेवारीतून काय समोर आले? : सरन्‍यायाधीश

आज सुनावणीच्‍या प्रारंभी नीटपरीक्षेच्‍या केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकालाच्‍या आकडेवारीतून काय समोर आले?, असा सवाल सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केला. यावर याचिकाकर्त्यांचे वकील हुडा यांनी सांगितले की, आम्‍ही या निकालाच्‍या आधारे एक पत्रक सादर केले आहे. नीट परीक्षेचा पेपर व्हॉट्सॲपवर प्रसार झाल्याचे मान्य करतात. ४ जुलै राजी विद्यार्थ्यांना लीक झालेले पेपर देण्यात आल्याचे बिहार पोलिसांनी सादर केलेले पुरावे दर्शवतात. तसेच जेव्हा मी म्हणालो प्रश्नपत्रिका ई रिक्षाने घेतली होती. पण केंद्राने सांगितले ती 'ओएमआर' शीट्स होती, असे वकील हुडा म्‍हणाले यावर ई-रिक्षानेच प्रश्नपत्रिका नेली गेली ही एक वस्तुस्थिती आहे; परंतु लहानसा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वितरित केलेले चित्र हे OMR शीटचे होते, प्रश्नपत्रिकेचे नव्हते, असे सरन्‍यायाधीशांनी स्‍पष्‍ट केले.

नीट परीक्षेचा पेपर ४ मेपूर्वीच फुटला होता : सरन्‍यायाधीश

नितेश कुमार, अमित आनंद आणि सिकंदर प्रसाद यांच्‍या जबाबातून पेपर हा परीक्षेपूर्वीच फुटला असल्‍याचे सूचित होते, असा दावा ॲड. हुडा यांनी केला. यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्‍हणाले की, या प्रकरणात अमित आनंद हा एक मध्यस्थ आहे. नीटची परीक्षा ५ मे रोजी होती. त्‍यापूर्वी एक दिवस म्‍हणजे ४ मेच्‍या रात्री तो विद्यार्थ्यांना गोळा करत होता. यावरुन असे सूचित होते की, विद्यार्थ्यांना ४ मेच्‍या रात्रीच उत्तरे लक्षात ठेवण्यास सांगितले जात होते याचा अर्थ नीट परीक्षाचा पेपर ४ मे पूर्वीच फुटला होता. पेपरफुटी ४ मेच्‍या रात्र झाले असेल तर साहजिकच ती वाहतुकीच्‍या माध्‍यमातून झाली नाही तर ती पेपर जेथे ठेवण्‍यात आले हाेते त्‍या स्ट्राँग रूममधूनच झाली होती, असेही सरन्‍यायाधीशांनी नमूद केले.

मागील सुनावणीत काय झालं होतं?

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार NEET UG 2024 परीक्षेचा राज्‍य आणि केंद्रनिहाय निकाल २० जुलै रोजी घोषित करण्‍यात आला होता. 'एनटीए'ने NEET-UG 2024 परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण त्यांच्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवावी आणि शहर व केंद्रानुसार निकाल स्वतंत्रपणे जाहीर करावा. तसेच बिहार पोलिसांनी आपल्‍या तपास अहवालाची प्रत सादर करावी, असे निर्देश18 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने 'एनटीए'ला दिले होते.

४० हून अधिक याचिकांवर सुनावणी

न्यायालयात या प्रकरणी 40 हून अधिक याचिकांवर सुनावणी सुरू आहे. याचिकांमध्ये एनटीएच्या अर्जांचाही समावेश आहे. एनटीएने विविध उच्च न्यायालयांमधील प्रलंबित खटले सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.

'नीट'परीक्षा वाद, आतापर्यंत काय घडलं?

  • ५ मे २०२४ रोजी नीट परीक्षा झाली. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर झाला.

  • तब्‍बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्‍या पैकी गुण. तर काहींना ७२० पैकी ७१८, ७१९ गुण मिळाले. हरियाणाच्या एकाच केंद्रातील ६ विद्यार्थ्यांना पैकीच्‍या पैकी गुण मिळाले. यामुळे परीक्षेतील अनियमिततेबद्दल शंका निर्माण झाली.६७ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्‍यात आल्‍यानेच पैकीच्‍या पैकी गुण मिळाल्‍याचा आरोप करण्‍यात आला.

  • NTA ने 8 जून रोजी वाढीव गुणांच्‍या चौकशी करण्यासाठी समिती स्थापन.

  • परीक्षेनंतर आठ दिवसांनी पेपरफुटीच्या चौकशीसाठी पहिली याचिका दाखल.

  • बिहार पोलिसांनी ५ मे रोजी पेपरफुटीच्या संशयावरून १३ जणांना अटक केली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ मे रोजी पेपर फुटल्याचा आरोप फेटाळला.

  • NEET उमेदवार शिवांगी मिश्रा यांनी 13 मे रोजी पेपर फुटीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल.

  • १३ जून रोजी १,५६३ उमेदवारांना देण्‍यात आलेले ग्रेस गुण रद्द.

  • 13 जून रोजी, NTA ने 1563 अतिरिक्त गुणांसह उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करण्याची घोषणा केली. त्यापैकी 813 उमेदवार परीक्षेला बसले तर 750 उमेदवार परीक्षेला बसले नाहीत.

  • NTA ने 23 जून रोजी झालेल्या फेरपरीक्षेचा निकाल जारी केल्यानंतर 1 जुलै रोजी सुधारित गुणवत्ता यादीही जाहीर केली होती.या परीक्षेनंतर पैकीच्‍या पैकी गुण मिळवणार्‍या ६७ उमेदवारांची संख्‍या ६१ वर आली आहे.

  • ८ जुलै रोजी या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्‍पष्‍ट केले होते की, "परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता, सुमारे 24 लाख, पुन्हा चाचणीचे आदेश देणे योग्य होणार नाही. तसेच अशा अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून न्यायालय NEET परीक्षेच्या 'पावित्र्या'बद्दल काळजीत आहे. याची चौकशी करण्यासाठी सरकारने तज्ज्ञांची समिती स्थापन केली असेल, तर त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा."

  • केंद्र सरकारने आयआयटी मद्रासने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला होता. पेपरफुटी मोठ्या प्रमाणावर झाली नाही किंवा एकाच केंद्रातील अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला नाही, असे या अहवालात म्‍हटलं होतं.

  • ११ जुलै : सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्‍या अध्‍यक्षतेखालील न्‍यायमूर्ती जेबी परडीवाला, न्‍यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्‍या खंडपीठाने NEET-UG 2024 प्रकरणांची सुनावणी तहकूब केली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवार, १८ जुलै रोजी होणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

  • १८ जुलै : NEET-UG 2024 परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण त्यांच्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवून राज्‍य आणि केंद्रानुसार जाहीर करावा. बिहार पोलिसांनी आपल्‍या तपास अहवालाची प्रत सादर करावी, असे निर्देश18 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने दिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT